आता केईएममध्ये सर्व नवजात बालकांच्या कानाची होणार तपासणी

KEM hospital

आरोग्यनामा ऑनलाइन – आता केईएम रुग्णालयातील प्रत्येक नवजात बालकाच्या कानाची तपासणी केली जाणार आहे. या रुग्णालयाच्या ऑडिओलॉजी युनिटचे अत्याधुनिकीकरण केले असून येथे अत्याधुनिक मशीन कार्यान्वित केल्या आहेत. लायन्स क्लब ऑफ भायखळाने रुग्णालयातील ऑडिओलॉजी विभागास या मशीन दान केल्या आहेत. ऑडिओमीटर, टिमप्यानोमीटर, प्युटरटोन ऑडिओमीटर आणि बेरा मशीन यांचा यामध्ये समावेश आहे. जन्मापासून ऐकू न येणारे मूल आयुष्यभर मूकबधीर राहू नये, यासाठी प्रत्येक बालकाच्या तपासणीचा निर्णय रूग्णालयाने घेतला आहे.

या नव्या मशीन्सचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला बॉलीवूड अभिनेते बोमण इराणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एलसीआयएफ ग्रँट प्रोजेक्ट, लायन्स क्लब ऑफ भायखळा, लायन्स क्लब ऑफ क्विन-वे आणि केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या संयुक्त विद्यमाने या ऑडिऑलॉजी युनिटचे अत्याधुनिकीकरण केले आहे. यावेळी अभिनेते बोमण इराणी म्हणाले, ऐकू आणि बोलता येत नसलेल्या रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यासाठी ऑडिओलॉजी युनिटचे अत्याधुनिकरण करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना फायदाच होईल. मुळात ऐकू न येणे ही मोठी समस्या नाही असे लोकांना वाटते. त्यामुळे उपचार वेळीच करून घेतले जात नाही. मात्र ऐकण्याची क्षमता गेल्याने आयुष्यच बदलून जाते. लहान वयात मुलांमधील ही समस्या लक्षात आल्यास उपचार करणे सोपे होते. कर्णबधीर रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता आता या रुग्णांसाठी काम करायला मला नक्कीच आवडेल.

रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफाटिया म्हणाल्या, अनेकांना जन्मतः ऐकण्याची समस्या असते. मात्र बाळांना ऐकता किंवा बोलता येत नाही हे पालकांना उशिरा समजते. बाळ बोलण्याला प्रतिसाद देत नाही, असे लक्षात आल्यावर पालक डॉक्टरांकडे येतात. चाचण्या केल्यानंतर बाळाला ऐकू किंवा बोलता येत नसल्याचे समजते. त्यामुळे या युनिटद्वारे आता नवजात बाळाचीही चाचणी करता येईल. जेणेकरून अशी काही समस्या असल्याने तातडीने उपचार केले जातील. लहान मुलांसह अन्य वयोगटातील व्यक्तींवरही या युनिटद्वारे चाचणी सुविधा दिली जाणार आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख म्हणाले, बोलता आणि ऐकता न येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या रुग्णांना शोधून उपचार देता यावेत, यासाठी हा विभाग गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. आता या विभागाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आलं आहे. या अत्याधुनिक मशीन ठेवण्यात आल्या असून या माध्यमातून रुग्णांना ऐकण्याची समस्या आहे का याचं निदान करणं सोपे होणार आहे.