शांत झोप पाहिजे तर स्मार्टफोन दूर ठेवा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम- अंधाऱ्या खोलीमध्ये स्मार्टफोन वा टीव्ही पाहण्याची सवय असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. एका ताज्या अध्ययनातून असा इशारा देण्यात आला आहे की, पुरेशा प्रकाशाच्या तुलनेत अशा प्रकारच्या वातावरणात स्मार्टफोनचा वापर वा टीव्ही पाहिल्यामुळे तुमच्या झोपेचे खोबरे होऊ शकते. ब्रिटनमधील लिंकन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांनी सांगितले की, याआधीच्या अध्ययनांतून स्क्रीनच्या वापर आणि कमी वयाच्या लोकांमध्ये झोपेची गुणवत्ता यांच्यातील संबंध दिसून आला होता. या नव्या अध्ययनात टीव्ही व स्मार्टफोनच्या स्क्रीनवर खोलीतील प्रकाशाचा कशाप्रकारे प्रभाव पडू शकतो याचा अभ्यास करण्यातआला.
मुले आणि किशोरांमध्ये पुरेशा झोपेच्या अभावाचा संबंध प्रतिरक्षा प्रतिक्रियेतील गडबड, नैराश्य, व्यग्रता आणि लठ्ठपणासोबत असतो. झोपण्यापूर्वी मोबाइल फोन, टॅबलेट, लॅपटॉपचा वापराचा संबंध चांगली झोप न येणे आणि अपुऱ्या झोपेसोबत असू शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. सुमारे साडे सहा हजार किशोरवयीन मुलांवर केलेल्या अध्ययनाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.