आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी रनिंग किंवा जॉगिंग करणे हा उत्तम उपाय आहे. फॅट कमी करण्यासाठी व्यायामाचे वेळापत्रक पाळणे सुद्धा गरजेचे असते. काही नियमांचे पालन केल्यास वजन जलदगतीने कमी करता येते. तसेच जॉगिंग करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे हे आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
* शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत आवश्यक असते. जॉगिंगला जाताना कोमट पाण्याने भरलेली बाटली सोबत ठेवावी. जर ४५ मिनिटांची जॉगिंग करत असाल तर एक बॉटल पाणी प्यायला हवे.
* सकाळच्या जॉगिंगचे वेळापत्रक कोलमडते तेव्हा कंटाळा आल्यासारखे वाटते. यासाठी इतर उपक्रमांमध्ये सहभागी होणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे. वैविध्यामुळे कोणतेही काम आनंदाने करता येते. तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ हा चांगला पर्याय आहे.
* थंडीचे दिवस असतील तर सकाळी जॉगिंगला जाण्यापूर्वी हात, ओठ, नाक व कानांना पेट्रोलियम जेली लावावी. कारण त्वचेचा हा उघड्यावरील भाग हवेच्या संपर्कात आल्याने त्वचा कोरडी होते.
* जॉगिंग करताना सहकारी असतील ताजेतवाने वाटेल. अशा पद्धतीने तुम्ही तंदुरुस्त राहण्याबरोबरच विविध विषयांवर चर्चाही करू शकता. त्यामुळे वेळापत्रकही कायम राहील.
* उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जॉगिंग किंवा रनिंगचे वेळापत्रक पाळणे कठीण असले तरी लक्ष्य निश्चित केल्यास तुम्ही रुटीन कायम ठेवू शकता. महिनाभर तुम्ही व्यायामाचे वेळापत्रक पाळले वा नाही, याची डायरीत नोंद करून ठेवावी.
* जॉगिंगसाठी नेहमी सपाट रस्त्याचीच निवड करा. चढउतार असलेल्या रस्त्यावरून धावल्यास मसल्स इंज्युरी होते म्हणजेच स्नायूंमध्ये आकस निर्माण होणे किंवा चमक निघण्याची शक्यता असते.
* जॉगिंग करताना कपड्यांकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हंगामानुसार कपडे घालणे टाळावे. नेहमी हलके व सैल कपडे घालावेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी हातमोजे व कानपट्टी घालू शकता. तसेच पायात सुती मोजे व फीट बूट घालू नये.
* प्रथम वॉर्मअप करा. स्नायू वॉर्मअप होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे जॉगिंग करण्याच्या १०-१५ मिनिटे आधी चांगला वॉर्मअप करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्नायू लवचीक होतात.