आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गर्भावस्थेचा नऊ महिन्यांचा काळ आई आणि गर्भातील बाळासाठी कसा असतो हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. गरोदरपणात महिला आणि तिच्या गर्भातील बाळात अनेक बदल होत असतात. यातील काही बदल खूपच आश्चर्यकारक असतात. अशाच काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
१) गरोदरपणातील दुसऱ्या महिनात बाळाची श्रवण आणि दृष्टी इंद्रिय विकसित होऊ लागतात. पापण्या मिटलेल्या असतात. चेहऱ्याची ठेवण तयार होऊ लागते. बुद्धीचा विकास सुरू होतो. नाभिनाळ तयार होते. हात-पायांची बोटे, नखे तयार होऊ लागतात. अमाशय, यकृताचा विकास होऊ लागतो. बाळाची लांबी जवळपास ३ से.मी. आणि वजन १ ग्रॅम आहे. गर्भाशय पोटामध्ये एका कोमल गाठीप्रमाणे जाणवू लागतो.
२) तिसऱ्या महिनात गर्भाचा आकार खूप लहान असल्यामुळे बाळाची हलचाल जाणवत नाही. डोळे तयार झालेले असतात. परंतु, पापण्या मिटलेल्या असतात. हात, पाय, बोट, नख, पंजे या महिन्यात विकसित होतात.
३) चौथा महिन्यात बाळाची उंची आणि वजनामध्ये झपाट्याने वाढ होते. डोक्यावर केस येऊ लागतात. भुवया आणि पापण्यांचे केस तयार होऊ लागतात. त्वचा वसायुक्त होऊ लागते.
४) पाचव्या महिन्यात बाळ काही काळ गतिशील तर काही काळ शांत राहते. एक पांढरा चिकट स्त्राव बाळाच्या त्वचेचे गर्भाशयातील पाण्यापासून रक्षण करते. त्वचेचा रंग लाल होतो. त्वचा जास्त वसायुक्त बनते. या महिन्यात बाळाची उंची २५ ते ३० से.मी. आणि वजन जवळपास २०० ते ४५० ग्रॅम असते.
५) सहाव्या महिन्यात बाळाची त्वचा अजूनही लाल असते. डोळ्यांचा विकास पूर्ण झालेला असतो. पापण्या उघड-झाप होतात. बाळ रडू शकते, लाथ मारू शकते, त्याला उचकी लागू शकते.
६) सातव्या महिन्यात गरोदर महिलेच्या पोटाला कान लावल्यास बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. बाळ अंगठा चोखु लागते. या महिन्यात बाळाची उंची ३२-४२ से.मी. आणि वजन ११०० ग्रॅम ते १३५० ग्रॅम असते.
७) आठव्या महिन्यात गर्भाशयात बाळाचे डोळे उघडतात. जागे होणे, झोपणे अशा सवयींनी बाळ सक्रिय होते. या महिन्यात बाळाचे वजन २००० – २३०० ग्रॅम असते. या महिन्यात बाळाची हलचाल स्पष्टपणे जाणवते.
८) नवव्या महिन्यात बाळाचे डोके खालच्या बाजूला आणि पाय वर असतात. बाळ जास्त शांत राहते. या महिन्यात बाळाची उंची ५० से.मी. आणि वजन ३२००-३४०० ग्रॅम असते.