वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांच्या श्वसनविकारमध्ये वाढ
मुंबई : आरोग्यनामा ऑनलाइन – वाहतूक कोंडीमध्ये तासनतास अडकून पडणे हा मुंबईकरांच्या सवयीचा भाग झाला असून मुंबईच्या याच वाहतूक कोंडीने जगाच्या नकाशावर मुंबई क्रमांक एक वर आली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी जगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. वाहतूककोंडी हा मुंबईकरांचा जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला तरीही या वाहतूककोंडीमुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे असे निरीक्षण बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे नोंदविले आहे.
चार ते पाच तास प्रदूषित वातावरणात
वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त दुष्परिणाम हा आपल्या श्वसनसंस्थेवर होत असतो. मुंबईमध्ये सर्वात जास्त वाहतूककोंडी ही अंधेरी ते दहिसर दरम्यान असून ४ ते ५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी मुंबईकरांचा दीड ते दोन तास खर्ची होतो. मेट्रोचे बांधकाम, खाजगी चारचाकीची वाढलेली संख्या, रिक्षा व दुचाकीमुळे बिघडलेली वाहतूक यंत्रणा तसेच नवीन बांधकामे यामुळे जास्त प्रमाणात वायू प्रदूषण होते. वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा चार ते पाच तास प्रदूषित वातावरणात राहावे लागते व हेच वायू प्रदूषण आणि धुलिकण पश्चिम उपनगरातील नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहेत.
नायट्रोजनमुळे श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम
या विषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे फुफ्फुस विकार तज्ञ (पल्मोनोलॉजिस्ट) डॉ. पार्थीव शहा सांगतात, वाहनांमधून सोडले जाणारे कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स व नायट्रोजन ऑक्साइड हे घटक वायू प्रदूषणास कारणीभूत आहेत. नायट्रोजनमुळे श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होतात तसेच कार्बन मोनोक्साईड रक्तातील हिमोग्लोबिनबरोबर मिसळतो आणि रक्ताची ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी करतो. यासोबतचच सर्वात जास्त प्रदूषणाला कारणीभूत ठरलेला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बांधकामक्षेत्रात वापरले जाणारे सिमेंट, कारण सिमेंट जेथे जेथे आहे तेथे अॅसिनो बॅक्टर नावाचा बॅक्टेरिया खोकला, न्यूमोनियाला कारणीभूत ठरतो. सतत प्रदूषित हवेत काम करणाऱ्यांच्या फुप्फुसांवर परिणाम होतो.
फुप्फुसाचे विकार, क्षयरोग बळावण्याची शक्यता
प्रदूषित हवेत फुप्फुसांची ताकद कमी होते, फुप्फुसाचे गंभीर विकार होतात आणि क्षयरोग बळावण्याची शक्यता असते. मुंबई शहरांमध्ये विविध मार्गे कचरा जाळला जातो परंतु त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थित सोय उपलब्ध नसल्यामुळे अशा कचऱ्यामध्ये पालापाचोळा, कागद, टायर, प्लास्टिक असं सगळंच असतं. यापैकी टायर, प्लास्टिक पूर्णपणे जळत नाही. त्यातून शरीराला घातक असणारे विषारी वायूपदार्थ निर्माण होतात आणि आपल्या शरीरात प्रवेश करतात. प्रदूषणातील घातक वायू, सूक्ष्म कण नाकात गेल्यावर नाक चोंदणं, घशा खवखवणं, खोकला, कफ निर्माण होणं, ब्राँकायटिस हे आजार उद्भवतात.