पावसाळ्यात मधुमेही रुग्णांमध्ये ‘डायबेटिक फूट’च्या व्याधीत होते वाढ
याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे डायबेटिक फूट शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोयर म्हणाले, पावसाळ्यात पाय ओले राहील्यामुळे अथवा ओलाव्यामुळे पायांच्या तळव्याला इनफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. ज्याचा परिणाम पुढे गॅंगरिन म्हणजे डायबिटीक फूट होण्यामध्ये होऊ शकते. याशिवाय पावसाळ्यात घाम, ओलावा, बुरशी आणि सुक्ष्मजीवांना पोषक वातावरण असते. ज्याचा मधुमेहींना नक्कीच त्रास होऊ शकतो.
अपेक्स हॉस्पिटल समूहाने संपूर्ण जुलै महिना हा डायबेटिक फूट जागरूकता महिना साजरा करण्याचे ठरविले असून या महिन्यात मोफत तपासणी शिबीरे, चर्चासत्र तसेच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत काही प्रात्यक्षिके सुद्धा दाखविण्यात येणार आहे कारण पावसाळ्यामध्ये डायबेटिक फूटच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते.
मधुमेही रुग्णाच्या पायाला दुखापत झाल्यास ती लवकर बरी होत नाही यासाठी पावसाळ्यात मधुमेहींनी पायाला कोणतीही दुखापत होणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये पाय आणि पावलांमध्ये मधुमेहासंदर्भातील संसर्ग होण्याची शक्यता असते. छोट्या जखमा (कापणे, खरचटणे, फोड) न जाणवणे, पायाची सर्वसाधारण झीज (यातून भोवरी आणि पायाला घट्टे पडण्याचा त्रास होऊ शकतो.) आणि पायात उसण भरणे अशा त्रासांचा यात समावेश आहे. म्हणूनच पायांच्या दुखापतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे डायबेटिक फूट शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोयर यांनी दिली.