आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नेत्रदानाबाबत जनजागृती करणे व प्रत्यक्षात नेत्रदान घडवून आणणे या मोहिमेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन)ने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात व सामाजिक संस्थांच्या मदतीने अलीकडच्या काळात अवयव दान, नेत्रदान, रक्तदान आदी चळवळी मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे.
यामध्ये हरीना नेत्रदान समितीसारख्या संस्था व काही खासगी डॉक्टर आदींनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यामुळे १९९ नेत्रदान करवून घेण्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाला यश आले आहे. विशेष म्हणजे विदर्भ व विदर्भाबाहेरील इतर जिल्हा रुग्णालयातील ही आकडेवारी तुलनेने अत्यल्प आहे. या १९९ पैकी ५१ डोळ्यांचे संबंधित रुग्णांना यशस्वी प्रत्यारोपणही करण्यात आले आहे.
इतर जिल्ह्यातील अहवालांच्या तुलनेत इर्विन रुग्णालयाची आकडेवारी बरीच मोठी असल्यामुळे ही एक मोठी कामगिरी ठरली आहे. तसेच इर्विनच्याच नेत्रतज्ज्ञ डॉ.नम्रता सोनोने यांनी गतवर्षात जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्यामुळे सरकारी रुग्णालयातील सर्वाधिक शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांमध्ये त्यांनीही राज्याून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांना नुकताच पुण्यातील एका कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.