पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – मुंबईतील नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येने तीच्या समस्या उजेडात आल्या आहेत. वरिष्ठांच्या छळाला आणि रॅगिंगला कंटाळून ही आत्महत्या तिने केल्याचं समोर आलं आहे. सरकारी रूग्णालयात रॅगिंग आणि आत्महत्येचे प्रकार घडू नये तसंच डॉक्टरांनी डिप्रेशनमध्ये राहू नये यासाठी रूग्णालयांमध्ये समुपदेशन केंद्र (Counseling Centre) सुरू करण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला आहे . या उपक्रमाद्वारे कामाचा वाढता ताण कमी करणं, डॉक्टरांच्या आत्महत्या रोखणं, संबंधित समस्यांवर उपाय शोधणं या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.
उपक्रमाचा उद्देश
यात डॉक्टरांनी आपल्या समस्या कशा मांडाव्यात, खचून न जाता पुन्हा जोमानं कसं उभं राहावं, परिस्थिती कशी हाताळावी याबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हा उपक्रम सुरु करण्यामागे विद्यार्थी, निवासी डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मानसिक आरोग्यासमोरील आव्हानांचं वाढतं प्रमाण हाताळण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील वाढता ताणतणाव यामुळे डॉक्टरांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे. यात आपत्कालीन विभाग, प्रसूती विभाग, मानसोपचार, इंटेन्सिव्हिस्टस आणि भूलतज्ज्ञ या विभागांतील तज्ज्ञांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे डॉक्टरांनी स्वतः बरोबरच इतर डॉक्टरांची काळजी घेणं गरजेचं असल्यानं हा नवा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.