आरोग्यानामा ऑनलाईन टीम : निद्रानाशाची समस्या अलिकडे मोठ्याप्रमाणात वाढली आहे. चुकीची जीवनशैली, सततची धावपळ, स्पर्धा, मानसिक ताण-तणाव आदी कारणांमुळे ही समस्या जाणवते. रात्री सात-आठ तास झोप मिळाली नाही तर तुमचे आरोग्य बिघडू शकते. विविध आजारांचाही सामना करावा लागू शकतो. रात्री चांगली झोप लागण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
अशी घ्या काळजी
१ विचार टाळा
झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा विचार करणे, चिंता करणे टाळा. मेंदूला मनन करण्यासाठी व दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा सज्ज होण्यासाठी वेळ द्या.
२ जास्त पाणी पिऊ नका
भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असले तरी रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळा. कारण लघवीसाठी सतत उठावे लागल्यामुळे झोपमोड होऊ शकते.
३ चहा, कॉफी घेऊ नका
चहा व कॉफीतील कॅफिनमुळे झोप लागत नाही. रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा, कॉफी घेणे टाळा.
४ दिवसा झोपू नका
दुपारच्या झोपेच्या सवयीमुळे रात्रीची झोप बिघडू शकते.
५ धुम्रपान, मद्यपान टाळा
मद्यपान केल्याने झोप चांगली लागते हा गैरसमज आहे. ही सुखकारक झोप नसून यामुळे रात्री सारखी जाग येते. धुम्रपानामुळे सुद्धा चांगली झोप मिळत नाही.
६ झोपण्यापूर्वी व्यायाम नको
रात्री व्यायाम केल्यास निद्रानाश होण्याची शक्यता वाढते. सकाळी वेळ मिळत नसल्यास झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी व्यायाम करावा.
७ जास्त खाऊ नका
रात्रीचे जेवण कमी घेणे चांगले आहे. ते अतिमसालेदार असू नये.
८ लवकर जेवण करा
झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच चांगले आहे.
९ लगेच झोपू नका
जेवल्यावर लगेच झोपू नका. कारण जेवण पचन होण्यास वेळ लागतो.
Visit : arogyanama.com