आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपण बऱ्याचदा छोट्या-छोट्या समस्यांसाठीही डॉक्टरांकडे जातो. परंतु, अशा समस्या घरगुती उपचार करूनही ताबडतोब बऱ्या होऊ शकतात. परंतु, यासाठी काही गोष्टींची योग्य माहिती असणे खूपच आवश्यक आहे. ही माहिती जाणून घेतल्यास तुम्ही सुद्धा घरच्याघरी आरोग्याच्या काही समस्यांवर उपाय करू शकता. भाजणे, पायांमध्ये फंगल इंफेक्शन, त्वचा व हिरड्याशी संबंधित विकार आदी समस्यांवर घरच्या घरीच सहजपणे उपाय करता येऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. आरोग्याशी संबंधित कोणत्या समस्यांवर आपण घरी उपलब्ध पदार्थांचा वापर करून उपचार करू शकतो, याविषयी माहिती घेवूयात. घरच्या घरी उपलब्ध असलेला बेकिंग सोडा वापरून काळे पडलेले दात पांढरे होऊ शकतात. अनेक डेंटिस्ट दातांच्या मुळात असलेले सुपरफिशियल स्टेंस हटवण्यासाठी बेकिंग सोडा वापरण्याचा सल्ला देतात. यामुळे दात चमकदार होतात. तसेच तोंडाचा वासही येत नाही. शिवाय, प्लाकही होत नाही.
सूर्यप्रकाशाच्या अधिक संपर्कात राहिल्याने इजा झालेली त्वचा आणि इतर विकार दूर करण्यात बेकिंग सोडा फायदेशीर आहे. बेकिंग सोड्यातील सोडियम बायकार्बोनेट त्वचेचा टेक्शचर सुधारण्यात मदत करते. त्यामुळे आंघोळ करण्यापूर्वी बेकिंग सोडा पाण्यात मिसळला तर चांगला परिणाम दिसून येतो, असे न्यूयॉर्क विद्यापीठातील डर्मेटोलॉजीचे क्लिनिकल असिस्टंट प्रोफेसर लिंडा के. फ्रँक्स म्हणतात.
श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माऊथ वॉशचा वापर केला जातो. माऊथ वॉशच्या अँटिमायक्रोबियल प्रॉपर्टीमुळे तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. माऊथ वॉशमुळे श्वासाची दुर्गंधी सुद्धा दूर होते. खेळाडूंच्या पायांमध्ये होणाऱ्या फंगल इंफेक्शनपासून बचाव करण्यासाठी सुद्धा माऊथ वॉश घेणे लाभदायक ठरू शकते. आंघोळ केल्यानंतर कापसाच्या बोळ्यात माऊथ वॉश घेऊन पायांच्या बोटांमध्ये लावावा. माऊथ वॉशच्या अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीमुळे इंफेक्शनसाठी कारणीभूत बॅक्टेरिया नष्ट होतात.
आणखी एक घरच्याघरी करता येण्यासारखा उपचार म्हणजे भाजल्यावर कोरफडीचा जेल एक किंवा दोन डिग्रीवर जळालेल्या जागेवर लावल्यास आराम पडतो. तसेच तोंडात फोड आल्यावर कोरफडीचा गर लावल्यास फरक पडतो. कोरफडीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात, तसेच अॅमीनो अॅसिडही असते. यामुळे तोंडातील फोडांमुळे दुखापतग्रस्त झालेल्या टिश्युजचे नूतनीकरण करण्यास मदत होते. तसेच तोंड आल्यानंतर तोंडातील फोडांमुळे येणारी सूज दूर करण्यातही कोरफड फायदेशीर आहे. या फोडांवर कोरफडीचा गर लावल्याने ५० टक्के आराम पडतो, असे अमेरिकन सोसायटी फॉर डेंटल अॅस्थेटिक्सचे अध्यक्ष इरवीन स्मिजेल यांनी म्हटले आहे. तसेच पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते यामध्ये असलेले प्रोबायोटिक बॅक्टेरिया पचनक्रिया चांगली ठेवतात. तसेच दह्यामुळे बाउल फंक्शन म्हणजेच पोट साफ होण्याची प्रक्रिया सुद्धा नियमित राहते. तसेच दह्यामध्ये आढळून येणाऱ्या लॅक्टिक अॅसिडमुळे हिरड्यांचा हानिकारक बॅक्टेरियापासून बचाव होऊन हिरड्यांशी संबंधित त्रास दूर होतो. दररोज ५५ ग्रॅम दह्याचा जेवणात समावेश केल्याने पिरिओडोंटल डिसीज म्हणजेच हिरड्यांशी संबंधित समस्या होण्याची शक्यता कमी होऊ शकते. तसेच जे लोक दह्याचे सेवन करत नाहीत त्यांना हे विकार होण्याचा धोका जास्त असल्याचे जपान येथील क्युशू विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.