आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्राचीन काळापासून भारतात हळदीचा वापर जेवणात केला जात आहे. हळदीमुळे जेवण स्वादिष्ट होते. शिवाय, यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने हळदयुक्त जेवण आरोग्यासाठी लाभदायक ठरते. आयुर्वेदात हळदीला खूप महत्वाचे स्थान आहे. हळद उत्तम अँटीसेप्टिक आहे. मधुमेह, त्वचारोग, अॅलर्जी आदी आजारांवर हळद गुणकारी आहे. हळदीला हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन अशी नावेही आहेत.
हे आहेत हळदीचे फायदे
* मधुमेह असल्यास दररोज गरम दूधात हळद टाकून दूध प्यावे. हळदीमध्ये वातनाशक गुण असल्यामुळे मधुमेहाची समस्या असणाऱ्यांना याचा चांगलाच फायदा होतो. आवळ्याचा रस, हळद आणि मध एकत्र करून पिल्याने मधुमेहाच्या रुग्णाला आराम मिळतो.
* कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी जेवणात हळदीचा जास्त वापर करावा. अमेरिकन संशोधनानुसार हळदीमधील करक्यूमिन तत्व कॅन्सर कोशिका नष्ट करते आणि शरीराचा कॅन्सरपासून बचाव करते.
* त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासाठी कोमट खोबरेल तेलात हळद पावडर टाकून त्याची पेस्ट करून हातापायावर लावावी. यामुळे त्वचा मुलायम होते. आणि नको असलेले केसही कमी होतात.
* पोटात जंत झाले असतील तर एक चमचा हळद पावडर दररोज सकाळी एक आठवडाभर पाण्याबरोबर घ्यावी.
* दुधात हळद मिसळून दूध देण्याचीही आपल्याकडे प्रथा आहे. यामुळे जखम भरून येते. हळदीचा लेप दिल्याने जखम वेगाने भरते.
* सर्दी-खोकला झाल्यास हळद घालून दूध प्यावे. तसेच अद्रक आणि एक चमचा हळदीच्या रसात मध मिसळून पिल्याने सर्दी-खोकला बरा होतो.
* शरीरावर कोठे गाठ आल्यास हळद आणि मोहरीचे तेल एकत्र गरम करून गाठीवर लावावे. दररोज सकाळी दोन ते तीन ग्रॅम हळद खाल्याने गाठ लवकर बरी होते.
* चेहऱ्यावरील डाग, सुरकत्या नष्ट करण्यासाठी हळद आणि काळे तीळ समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी. हळद-दूधाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.