आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी कितीही उबदार कपडे घातले तरी शरीराच्या आत गर्मी असणे आवश्यक असते. शरीरामध्ये जर स्वतःला ऋतूप्रमाणे बदलण्याची क्षमता असेल तर थंडी कमी जाणवते. यामुळे विविध आजारांपासून दुर राहता येते. यासाठी थंडीच्या दिवसात आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आहाराचे योग्य नियोजन केल्यास शरीर संतुलित राहते. अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेवूयात.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड
मासे, मोहरीचे तेल, सोयाबीन, अक्रोड, जवस या पदार्थांचे सेवन करावे. जवसात ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते आणि आजार दूर राहतात.
शेंगदाणे
शेंगदाणे आयर्न, नियासिन, फॉलेट, कॅल्शिअम आणि झिंकचा उत्तम स्रोत आहेत. शेंगदाण्यातील पोषकतत्त्व मिळवण्यासाठी हिवाळ्यात दररोज लाल आवरण असलेले शेंगदाणे अवश्य खावेत.
भाज्या
भाज्या, शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढवतात. हिवाळ्यात मेथी, गाजर, पालक, बीट, लसूण इत्यादी भाज्या खाव्यात. यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते.
तिळ
तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगले असते. त्यातील झिंक हाडांचा ठिसूळपणा रोखते. तिळातील लोह, कॉपर शरीरातील लोहाच्या अभिशोषणास मदत करते, संधीवातासारख्या विकारांवर उपयुक्त आहे. यातील फायटोस्टिरोल्स कॅन्सरपासून संरक्षण करतात.
बाजरी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी अवश्य खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी अवश्य खाऊ घालावी. यामध्ये आरोग्यवर्धक गुण असतात. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅग्नीज, फायबर, व्हिटॅमिन- बी, अँटीऑक्सीडेंट तत्त्व भरपूर असते.
बदाम
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करते. बदामात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि फायबर असते. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने महिलांनी याचे सेवन करणे फायद्याचे असते.
अद्रक
यामुळे शरीराला गरमी मिळते आणि डायजेशनही चांगले होते. अद्रक तिखट रसाचे, पाचक, मलसारक आहे. यात पोटदुखीची समस्या त्वरित दूर करण्याची क्षमता आहे. अद्रकच्या सेवनाने गॅस, अॅसिडिटीची समस्या निर्माण करणारे विषाणू नष्ट होतात.
मध
हिवाळ्यात मधाचा उपयोग विशेष लाभकारी ठरतो. या काळात आहारामध्ये मधाचा अवश्य समावेश करावा. यामुळे पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.