आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणाच्या समस्येतून मार्ग काढण्याची इच्छा असल्यास वजन सहज कमी करता येते. यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे सुद्धा गरजेचे असते. कारण चूकीच्या उपायामुळे मेहनत तर वाया जातेच, शिवाय हाती सुद्धा काहीच लागत नाही. पोटाची चरबी वाढणे अनेक आजारांना आमंत्रण ठरू शकते. यामुळे फिगर खराब होतेच, शिवाय आरोग्यही बिघडू शकते. अनियमित दिनचर्या आणि आहारामुळे ही समस्या निर्माण होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी निवडक तीन योगासने सात दिवस केल्यास निश्चितच फरक पडतो.
पवनमुक्तासन :
दोन्ही पाय एकमेकांजवळ आणून चिकटवून ठेवावेत. हात शरीराच्या दोन्ही बाजूला शरीरालगत, तळहात जमिनीवर टेकवून ठेवावेत. नंतर पोटाच्या स्नायूंचा संकोच करून, दोन्ही पाय जमिनीपासून थोड्या अंतरावर वर उचलावेत व हळूहळू गुडघ्यामध्ये दुमडून घ्यावे आणि हे दुमडलेले गुडघे छातीच्या जवळ ओढून घ्यावेत. दोन्ही हातांनी गुडघ्यांना विळखा घालावा. उजव्या हाताने डावे कोपर आणि डाव्या हाताने उजवे कोपर धरावे. नंतर गुडघे हळूहळू छातीवर दाबावेत.
त्यानंतर डोके वर उचलून हनुवटीने किंवा कपाळाने गुडघ्यांना स्पर्श करावा. डोळे मिटावेत. हीच पवनमुक्तासनाची अपेक्षित स्थिती आहे. लक्ष श्वासावर केंद्रित करावे. नैसर्गिकपणे श्वास चालू ठेवावा. श्वास रोखून धरू नये. सुरुवातीला ३ ते १० श्वासांची ३ ते ५ आवर्तने करावीत. नंतर हळूहळू ५ ते १५ श्वासांची ४ ते ५ आवर्तने करावीत. उलट्या क्रमाने हळूहळू आसन सोडावे व नंतर सर्व शरीर शिथिल करावे. यामुळे पचन आणि उत्सर्जन या संस्थांची कार्ये व्यवस्थितपणे चालतात. आतड्यांची कार्यक्षमता वाढते.
पश्चिमोत्तासन:
पायांना समोर फैलावून बसा. पायाच्या पंजांना बाहेरच्या दिशेला ताणून बसा. तळ हातांना गुडघ्यांवर ठेवून श्वास रोखून हातांना वरच्या दिशेला उचला आणि कंबरेला सरळ करून वरच्या दिशेला ताण द्या. आता श्वास सोडत पुढे वाका आणि हातांनी पायांच्या अंगठ्यांना पकडण्याचा प्रयत्न करावा. तसेच डोक्याला गुडघ्यांवर टेकवा. एक लक्षात ठेवा की, गुडघे वाकायला नको. आता कोपरांना जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. डोळे बंद करून श्वास साधारण ठेवा. नंतर श्वास घेऊन जैसे थे स्थितीत या. ही क्रिया १० ते १५ वेळा करा. या आसनामध्ये पाठीचे स्नायू ताणतात, त्यामुळे त्याला पश्चिमोत्तासन म्हणतात. हे आसन केल्याने पोटाची चरबी कमी केली जाऊ शकते आणि वजनही कमी होते.
धनुरासन
या आसनाने शरीराची आकृती वाकाविलेल्या धनुष्यासारखी बनते म्हणून यास धनुरासन म्हटले जाते. हे करण्यासाठी जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पालथे झोपा. दोन्ही पाय एकमेकांशी जुळूवुन ठेवा. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हात पाठीमागे नेऊन दोन्ही पायांचे घोटे पकडा. त्यानंतर हाताने पकडलेल्या पायांना हळूहळू खेचून वर उचला. शक्य होईल तितके डोके मागील बाजूस नेण्याचा प्रयत्न करा. दृष्टी देखील वर आणि मागील बाजूस असली पाहिजे.
संपूर्ण शरीराचा भार केवळ पोटावर राहील. कंबरेपासून वरील शरीर तसेच कंबरेखालील भाग वरच्या बाजूस वाकविलेल्या स्थितीत राहील. थोडावेळ या स्थितीत राहिल्यानंतर हात सोडून पाय आणि डोके मूळ स्थितीत न्या. सुरुवातील पाच सेकंद हे आसन करावे. त्यानंतर हळूहळू वेळ वाढवत तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ या आसनाचा अभ्यास करा.
हा लाभ होईल
धनुरासनाच्या अभ्यासाने पोटाची चरबी कमी होते. गॅस दूर होतो. पोटाचे रोग नाहीसे होतात. छातीचे दुखणे बंद होते. हृदय मजबूत होते. श्वसन क्रिया व्यवस्थित चालते. शरीराचे सौंदर्य वाढते.