आरोग्यनामा ऑनलाईन – चमचमीत, तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यात आले की पोटात गडबड होते. पोटात जळजळ होते, गॅसने पोट फुगते असा त्रास सुरू होतो. अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असणाऱ्यांना तर चमचमीत, मसालेदार पदार्थ वर्जच असतात. त्यांच्या पोटही नेहमी गरम राहते. या समस्येने अस्वस्थ वाटू लागते. त्याचा परिणाम दिवसभरातील सर्व कामांवर होतो. अशा वेळी काही घरगुती उपाय केल्यास आराम मिळू शकतो. अन्न पचण्यासाठी आवश्यक असलेला रस तयार होण्यात अनियमीतता झाल्यास छातीत आणि पोटात जळजळ होते. घरगुती पदार्थांच्या माध्यमातून या समस्येवर उपाय करता येऊ शकतो. या उपायाने पोटाच्या समस्येसह अन्य समस्या दूर होतात. पोटातील जळजळ होण्याची समस्या असेल तर रोज जेवण झाल्यावर थोडा गूळ चघळावा.
गूळ चाऊन खाऊ नका. जितका जास्त तुम्ही गूळ चघळाल तितका जास्त फायदा होईल. याने पचनक्रियेची क्षमता वाढते आणि पोटाची जळजळ कमी होत जाते. तसेच यावर टोमॅटोदेखील लाभदायक आहे. कच्चा टोमॅटोचा आहारात समावेश करा. याने अॅसिडिटी आणि पोटाची जळजळ दूर होते. टोमॅटोमुळे शरीरातील क्षारचे प्रमाण वाढते. संत्र्यामुळेही असाच फायदा होतो. पोटातील जळजळ आणि गरम वाटणे यावर आल्याचा रस गुणकारी आहे. लिंबाचा रस, मध आणि आल्याचा रस पाण्यात एकत्र करुन घेतल्यास पोट शांत होते. आल्यामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणही असतात त्यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होतात.१ कप उकळलेल्या पाण्यात एक चमचा बडीशेप टाकून रात्रभर ठेवा. सकाळी हे मिश्रण गाळून त्यात एक चमचा मध टाकून सेवन करा. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घेतल्यास पोटाची जळजळ, अॅसिडिटीची समस्या दूर होईल. तसेच पोट फुगणे आणि गॅसची समस्याही दूर होते. एका पॅनमध्ये ओवा भाजून त्याची पावडर तयार करून त्यामध्ये थोडे काळे मीठ टाकावे. हे जेवण केल्यावर कोमट पाण्यासोबत सेवन केल्यास पोटाची जळजळ आणि अॅसिडिटी दूर होईल.