आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चरबीचे विघटन करणारे अथवा नियंत्रणात ठेवणारे अनेक पदार्थ असून या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोट आणि कमरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करायची असल्यास केवळ व्यायाम पुरेसा नसून त्यासाठी आहाराकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास पोटाचा आकार वाढत जातो. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जात नाहीत. पाचनक्रिया योग्य पद्धतीने सुधारण्यासाठी पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. पाण्यामुळे चयापचय प्रक्रिया तीव्र होते. ती कॅलरी जाळण्यासाठी आवश्यक असते.
चरबी का वाढते याबाबत आपण माहिती घेतली. आता वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत, याविषयी जाणून घेवूयात. जवसामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. ते कमरेभोवती जमा होणारी चरबी कमी करतात. सोबतच कोलेस्टेरॉलची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते. जवसात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचन प्रणाली सुधारते. जवसाचा वापर सलाडमध्ये सुद्धा करता येतो. तसेच दह्यात फॅट आणि कॅलरी कमी असते. परिणामी ते वजन कमी करण्यासाठी मदतीचे ठरते. जेवणात आणि स्नॅक्समध्ये याचा वापर करावा. दह्यात असणारे प्रो-बायोटिक पोटातील बॅक्टेरिया वाढीस चालना देतात. ते पचन प्रणालीत सुधारणा करतात.
स्ट्राॅबेरी, रासबेरी यासारख्या लाल रंगाच्या फळांचा आहार घेतल्याने सुद्धा पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. एका संशोधनानुसार चरबी कमी करण्यासाठी सर्व प्रकारची लाल आणि जांभळ्या रंगाची फळे खावीत. या लाल रंगाच्या फळांमधील अँथोसिएनिन्स नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे चरबीचे विघटन होते. तसेच व्हिटॅमिन सी मुळे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे