आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आता लग्नाच्या आधी दोन्ही व्यक्तींची HIV चाचणी आवश्यक असण्याचा कायदा आता लवकरच येणार आहे. गोवा सरकार हा कायदा बनवणार आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी हा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर कायदे विभागाचा मतही आजमावला जाणार आहे.
हा कायदा आरोग्याच्या दृष्टीने विचार करून बनवला जाणार आहे. लग्नाच्या आधी जर HIV चाचणी घेतली गेली तर नवरा आणि नवरीच्या आरोग्यासाठी ते हितकारक ठरेल, असा या कायद्यामागचा विचार आहे. हा प्रस्ताव कायदे विभागासोबतच आणखीही विभागांकडे पाठवण्यात आला आहे. या संबंधित विभागांनी संमती दिली तर याबदद्लचा कायदा पावसाळी अधिवेशनात बनवला जाईल.गोव्याचे पावसाळी अधिवेशन 15 जुलैपासून सुरू होणार आहे.
HIV चाचणी सोबतच थॅलिसिमियाबदद्लच्या चाचणीचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या चाचणीमुळे विवाहित दाम्पत्यांना होणारा मूल या आजारामुळे बाधित होऊ शकणार नाही याची काळजी घेता येईल. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे सध्या या दोन्ही कायद्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोवा हे प्रगतिशील राज्य असल्यामुळे तिथे हा कायद लागू करता येतील, असे विश्वजीत राणेंचे मत आहे.
याआधीही या कायद्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता. २००६ मध्ये आरोग्य मंत्री दयानंद नार्वेकर यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. गोवा कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरीही दिली होती. पण हा कायदा अस्तित्वात येऊ शकला नाही.