मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली असून डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रूग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच जून महिन्यात संसर्गजन्य आजाराने एकही बळी गेलेला नाही, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने जून महिन्यातील ही आकडेवारी जाहीर केली आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला जून महिन्यात डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. योग्यवेळी निदान आणि उपचारांमुळे हे शक्य झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हेपेटायटिसच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील एल वॉर्डमध्ये हेपेटायटिसच्या रूग्णांचे प्रमाण जास्त आहे. २८२ पैकी तब्बल १६९ रूग्ण हे या वार्डात आढळून आले आहेत.

दरम्यान, हेपेटायटिसला प्रतिबंध करण्यासाठी शौचाला जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुणे, जेवण बनवताना आणि जेवणाआधी हात धुणे, पाणी उकळून प्यावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी, हिरव्या पालेभाज्या धुवून घ्याव्यात, गरोदर महिलांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात विविध आजारांच्या रूग्णांची संख्या पुढील प्रमाणे :
  • आजार २०१८ २०१९
  • डेंग्यू २१ ८
  • मलेरिया ३९२ ३१०
  • लेप्टो ५ ५
  • गॅस्ट्रो ७७९ ७७७
  • हेपेटायटिस ९४ २८२