भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ‘हिपॅटायटीस’ या संसर्गजन्य रोगाचा भारताला मोठा धोका आहे. भारतात जवळपास १ कोटींपेक्षाही अधिक लोक हिपॅटायटीसला बळी पडलेले आहेत. एचआयव्ही किंवा एड्सची लागण झालेल्यांपेक्षा ही आकडेवारी सहापट जास्त आहे.

हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे पसरणारा आजार आहे. हिपॅटायटीस यकृताच्या कार्यावर आघात  करतो.  त्यामुळे यकृत  (लीव्हर)  सुजण्याची शक्यता असते. यामुळे मृत्यूदेखील ओढावू शकतो. डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दक्षिणपूर्व आशियात दरवर्षी साडेतीन दशलक्ष लोक हेपेटायटीसमुळे मृत्युमुखी पडतात. हा आकडा  एचआयव्ही आणि मलेरियाच्या आजाराने मृत्युमुखी पडणारांच्या तुलनेत अधिक आहे.

दूषित पाणी , व्हायरल इंफेक्शन , यकृताजवळील रोगप्रतिकार पेशी कमकुवत होणे, अतिप्रमाणात मद्यसेवन , अतिप्रमाणात औषधं घेणे  यांसारख्या कारणांमुळे हिपॅटायटीस पसरतो. विशेषतः  पावसाळ्यामध्ये हिपॅटायटीस विषाणूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो.

हिपॅटायटीसची लक्षणे –

थकवा , मळमळणे , उलट्या , पोटदुखी , मुत्राचा गडद  रंग ,खाज येणे ,भूक मंदावणे ,वजन घटणे ही हिपॅटायटीसची प्राथमिक लक्षणे आहेत.

हिपॅटायटीसपासून असा करा बचाव –

पावसाळ्यात वेगाने पसरणाऱ्या या व्हायरसपासून वाचण्यासाठी नियमितपणे मेडिकल चेकअप करून घ्या.
आपल्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखा.
हा आजार यकृताशी निगडित असल्याने शक्यतो उघड्यावरचे आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा.