आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेली हृदयाची हानी भरू काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन जीन थेरेपी (जनुकीय उपचारपद्धती) विकसित केली आहे. हृदयाच्या धमन्यांमध्ये अचानक ब्लॉक तयार झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात २.३ कोटी लोक यामुळे पीडित आहेत.
ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर ह्रदयाच्या संरचनेला हानी पोहोचते. भविष्यात त्यामुळे ह्रदय बंदही पडू शकते. ब्रिटनमधील किंग्ज कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, मायक्रोआरएनए-१९९ नावाच्या जीव थेरेपीद्वारे हानीग्रस्त झालेल्या ह्रदयात सुधारणा करण्यात ह्रदय पेशींना मदत होते. डुकरांवर करण्यात आलेली अशा प्रकारची चाचणी यशस्वी ठरली आहे. जीन थेरेपीद्वारे अवघ्या एका महिन्यामध्ये ह्रदयाची पूर्ण दुरुस्ती होते. वैद्यकीय चाचणी सुरू करण्याच्या आधी सध्या या उपचारपद्धतीच्या आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.