कमी वयात हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : हार्ट अॅटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे. याची विविध कारणे संशोधकांकडून सांगितली जात असली तरी बदललेली जीवनशैली हे या समस्येमागचे सर्वात मोठे कारण आहे. जगभरात हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढले असले तरी भारतात ही समस्या अधिक गंभीर आहे. येथे ३० ते ३५ वर्षांच्या वयोगटीतील व्यक्तींनाही हार्ट अॅटॅक येऊन मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. भारतात हार्ट अॅटॅक येण्याचे वय १० वर्षांनी कमी झाले आहे. म्हणजे कमी वयातच हार्ट अॅटॅक येत आहे. असे का होत आहे ? याचे कारण आपण जाणून घेणार आहोत.
आशियाई लोकांमध्ये हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता जास्त असते. याचे कारण काय हे अजूनही स्पष्ट झाले नसले तरी बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे आजार वाढत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.धूम्रपान करणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह, फळे आणि हिरव्या पालेभाज्या कमी खाणे, व्यायामाचा अभाव, पोटावर अतिरिक्त चरबी तयार होणे, ही हार्ट अॅटॅक येण्याची काही कारणे आहेत. यापासून बचाव करायचा असेल तर रोज ३० मिनिटे व्यायाम करणे, बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळाणे, धूम्रपान आणि दारू पिणे टाळावे, वयाच्या तिशीनंतर आरोग्य तपासणी करावी, जंक फूड टाळावे, ही पथ्ये पाळली तर हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता खूप कमी होऊ शकते.