आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किरकोळ दुखणी अंगावर काढण्याची आपल्याला सवय असते. तसेच अशा किरकोळ दुखण्यात अनेकदा मेडिकल स्टोअरमधून वेदनाशामक गोळी आणून घेतली जाते. यामुळे तात्पुरता आरामही मिळतो. परंतु, असे करणे धोकादायक ठरू शकते. दुखणे छोटे असले तरी ते मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. म्हणून कधीही दुखणे छोटे आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. तसेच पेनकिलर घेऊन तात्पुरता इलाज करण्याच्या भानगडीत पडून नका. अशावेळी डॉक्टरांकडे जाणे हाच योग्य मार्ग आहे.
हे असू शकते हृदयरोगाचे लक्षण
पायाच्या पोटऱ्या दुखणे, सुजणे किंवा दुखणाऱ्या भागाची त्वचा लाल होणे ही लक्षणे डीपवेन थोंबोसिसची असू शकतात. यास ब्लडक्लॉट म्हणजेच रक्तगुटळ्या असे सुद्धा म्हणतात. जे लोक एकाच ठिकाणी बसून काम करतात त्यांना हा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. अशाप्रकारचा त्रास टाळण्यासाठी कामाच्या मध्ये-मध्ये थोडा ब्रेक घ्यावा. तसेच अधूनमधून पाय मोकळे करण्यासाठी चालावे व गरजेनुसार बॉडी मसाज सुद्धा करावी. छातीत जळजळणे किंवा दुखण्याचा त्रास खास करून तिखट जेवण घेतल्यानंतर होतो. हा त्रास हृदयरोगाचे कारण ठरू शकतो. वय ४५ पेक्षा जास्त असल्यास आणि असा त्रास सतत होत असल्यास ही हृदयरोगाची लक्षणे असू शकतात. अशावेळी साधा आहार घ्यावा. तसेच नियमित व्यायाम करावा. आणि हृदयाची चाचणी करून घ्यावी.
डॉक्टरांकडे जा, वेळीच उपचार घ्या
पोटात दीर्घकाळापासून दुखणे, जेवण करताना त्रास, शौचावेळी दुखणे असा त्रास होत असल्यास ही ओवेरियन कॅन्सरची लक्षणे असू शकतात. असा त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. वेळीच उपचार केल्यास ९० टक्के समस्या दूर होऊ शकते. तसेच पाठदुखीसोबत पाय सुन्न होत असतील तर हे रक्तसंचार प्रभावित होण्याचे लक्षण असू शकते. पाठीच्या कण्यावर दाब पडतो त्यावेळी ही लक्षणे दिसतात. पाठीच्या कण्यात पातळ डिस्कची भूमिका महत्त्वाची असते. हे डिस्क स्पंज कुशनप्रमाणे काम करते. असा त्रास होत असल्यास ऑर्थोपेडिकचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय करण्याचे टाळावे. एक्स-रे किंवा एमआरआय चाचणी करून नेमका त्रास जाणून घेतल्यास उपचार करणे शक्य होते.