आरोग्यनामा ऑनलाइन – हस्त मुद्रा हा योगासनाचा महत्त्वाचा भाग असून यामुळे मेंदू तल्लख होतो. शिवाय यकृत आणि हाडे मजबूत होतात. तसेच थायरॉइड आणि अॅसिडिटीमध्येही हस्त मुद्रा लाभदायक ठरतात. या मुद्रांचे प्रकार आणि त्यापासून फायदे याविषयी आपण माहिती घेऊयात.
पहिली मुद्रा आहे पृथ्वी मुद्रा. ही करण्यासाठी जमिनीवर पद्मासनात बसा. आता तर्जनीने अंगठ्याला स्पर्श करत हळूच दाबा. उर्वरित तिन्ही बोटे वरच्या दिशेने सरळ ताठ ठेवा. ही मुद्रा केल्याने हाडे आणि स्नायूंना बळकटी मिळते. यामुळे अशक्तपणा दूर होतो, ऊर्जा मिळते तसेच चेहरा उजळतो.
दुसरी मुद्रा आहे सूर्य मुद्रा. ही मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यांवर ठेवा. आता हातातील सूर्य असलेले बोट खालच्या दिशेने वाकवा आणि त्याला अंगठ्याने दाबा. ही मुद्रा जास्त थंडी वाजणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. यामुळे यकृताची समस्या दूर होऊ शकते. थायरॉइडच्या उपचारामध्ये परिणामकारक आहे.
तिसरी मुद्रा ही ज्ञान मुद्रा असून ती करण्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि सोबत आपल्या हातांचे पंजे पूर्णपणे उघडा. आता तर्जनीला आपल्या अंगठ्याने स्पर्श करा आणि उर्वरित बोटे तशीच सरळ खुली सोडा. ही मुद्रा केल्याने मेंदू तल्लख होतो. स्मरणशक्ती वाढते. त्वचा विकारांसाठी ही मुद्रा प्रभावी आहे. ही मुद्रा वजन कमी करण्यातही फायदेशीर आहे.
चौथी मुद्रा आहे वायू मुद्रा. ही करण्यासाठी दोन्ही हातांच्या तर्जनी अंगठ्याच्या खाली ठेवा. अंगठ्याने तर्जनीला हळूच दाबा. ही मुद्रा केल्यास अॅसिडिटीमध्ये फायदा होईल. पाठदुखी आणि स्पाँडिलेसिसमध्ये प्रभावी आहे. यामुळे व्हेरिकोज व्हेन्स कमी करण्यात मदत होते.