आरोग्यनामा ऑनलाइन टीम : लहान की मोठे प्रत्येकाच्या आवडी-निवडी या वेगवेगळ्या असतात. भाज्यांच्या बाबतीतही हे असेच असते. कोबी, फ्लॉवर, वांगी, भोपळा, भेंडी अशा मोजक्या भाज्या आपल्या नेहमीच खाण्यात असतात. पण, गवार, कारली, तोंडली, फरसबी अशा काही भाज्या आहेत, ज्यांचा अहारात क्वचित समावेश केला जातो. काहीजणांना तर या भाज्या आवडतही नाहीत. आवडत्या आणि नावडत्या भाज्यांची यादीच प्रत्येक घरातील गृहिणीला तोंडपाठ असते. नावडती भाजी बनवली घरातील काही सदस्यांची तोंडं वाकडी होतात. पण तुमच्या नावडत्या भाज्यांच्या मध्ये गवारीचे नाव असेल तर लवकरच आवडत्या भाजीत टाका. कारण गवारी खाण्याचे फायदे अनेक आहेत.
गवारीच्या भाजीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारी अनेक पौष्टिक तत्व आहेत. गवारी ही एक औषधी वनस्पती आहे. या भाजीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन के, सी, ए मुबलक असते. तसेच फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम असते. गवारीमध्ये कुठलेही कोलेस्ट्रॉल किंवा फॅट नसल्याने ही भाजी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. अनेक आजारांमध्ये गवारीची भाजी गुणकारी ठरते. त्यामुळे असे आजार दूर ठेवण्यासाठी गवारीचा उपयोग होतो. गवारीच्या भाजीमध्ये असलेले ग्लायको न्युट्रिएन्ट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. हे न्युट्रिएन्ट्स रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित करते. यामधील डाएट फायबर्समुळे अन्न लवकर पचन होते. मधुमेहाच्या रुग्णांनी कच्ची गवार खाल्ल्यास त्यांना जास्त फायदा होऊ शकतो.
तसेच हाडांच्या मजबुतीसाठी ही भाजी खूपच गुणकारी आहे. यातील कॅल्शियम, लोहतत्व आणि पोटॅशियममुळे हाडे मजबूत होतात. अशक्तपणा किंवा हाडांशी संबंधीत त्रास असल्यास गवारीच्या भाजीचे सेवन केल्यास चांगला फायदा होतो. विशेष म्हणजे हृदयासाठी गवारीची भाजी अतिशय गुणकारी आहे. या भाजीमधील फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी चांगले असते. या भाजीमुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत होते. गवारीच्या भाजीचा रस करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो. शिवाय गवारीच्या भाजीमुळे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते. यातील हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक गुणधर्मामुळे उच्च रक्तदाब असणारांना फायदा होतो. गरोदर महिलांसाठी सुद्धा गवारीची भाजी फायदेशीर आहे. या भाजीचे सेवन केल्याने गरोदर महिलांमधील आयर्न आणि कॅल्शिअमची कमतरता दूर होऊ शकते. गवारीमधील फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन्समुळे गर्भातील बाळाची वाढ चांगल्या पद्धतीने होते.