आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बेलाच्या झाडाचे मूळ, पाने, फांद्या, साल सर्व काही औषधी गुणांनी युक्त आहे. बिल्व फळाच्या विधिवत सेवनाने शरीर निरोगी आणि सुडौल होते. यामध्ये ह्रदयाला बळ आणि मेंदूला स्फूर्ती आणि सात्विक शांती प्रदान करण्याची क्षमता आहे. हे स्निग्ध, मऊ असून याचा गर, पाने, तसेच बियांमध्ये तेल असते. हे तेल सुद्धा औषधी आहे. बेलाचे काही खास उपाय आणि फायदे आपण जाणून घेणार आहोत.
या आजारांवर गुणकारी
* बेलमध्ये लेक्साटिव तत्वाचा स्तर जास्त प्रमाणात असतो. हे शरीरातील रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात ठेवते. शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. यामुळे डायबिटीजमध्ये आराम मिळतो.
* पिकलेल्या बेलफळाचा गर काढून तो सावलीत सुकवावा. त्यानंतर वाटून त्याचे चूर्ण बनवावे. हे चूर्ण सहा महिन्यांपर्यंत वापरता येते. हे पाचकतत्त्वांनी परिपूर्ण असते. आवश्यक वाटल्यास २ ते ५ ग्रॅम चूर्ण पाण्यात मिसळून घेऊ शकता.
* कच्चे बेलफळ भूक पचनशक्ती वाढविणारे तसेच कृमींचा नाश करणारे आहे. हे मलासह जलीय अंशाचे शोषण करणारे असल्याने अतिसारात अत्यंत गुणकारी आहे.
* एक पिकलेला बेलाचा गर रात्री मातीच्या भांड्यात भिजवून ठेवावा. सकाळी पाणी गाळून यात खडीसाखर मिसळावी. दररोज हे पाणी प्यावे. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्फूर्ती येते.
* बेलफळाच्या गराचा ३० ते ५० मि.ली. काढा मध मिसळून प्यायल्याने त्रिदोषजन्य उलटीत गुण येतो. गर्भवती स्त्रियांना उलटी व जुलाब झाल्यास २० ते २५ मि.ली. काढ्यात सातूचे पीठ मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.
* गोमुत्रात बेलफळ वाटून तयार झालेले मिश्रण १०० मि.ली. दुध, ३०० मि.ली. पाणी तसेच १०० मि.ली.तिळाच्या तेलात मिसळून मंद आचेवर उकळावे. हे बिल्वसिध्द तेल दररोज ४-४ थेंब कानात टाकल्याने कानदुखी व बहिरेपणात लाभ होतो.
* नियमितपणे बेलाच्या रसाचे सेवन केल्यास हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.
* आयुर्वेदामध्ये बेलापासून काढलेल्या तेलाचा वापर दमा आणि श्वसनाच्या रोगांवरील उपचारामध्ये केला जातो.
* २०० मि.ली. पाण्यात २५ ग्रॅम बेलाचा गर आणि २५ ग्रॅम खडीसाखर मिसळून सरबत बनवावे. हे प्यायल्याने छाती, पोट, डोळे तसेच तळपायांची जळजळ थांबते.
* एका बेलाचा गर १०० ग्रॅम पाण्यात उकळावा. गार झाल्यावर त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. व्रण बरे होतील.