आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिलांनी पोषक तत्त्वे घेण्यावर लक्ष देणे खूप गरजेचे असते. सर्व वयोगटातील तसेच शरीरयष्टीच्या महिलांनी ही काळजी घेतली पाहिजे. यासाठी फळे, भाज्या, धान्य आणि आरोग्यदायी अन्न सेवन केले पाहिजे. यातून ही पोषक तत्त्वे शरीरास मिळत असतात. महिलांसाठी सर्वोत्कृष्ट पोषक आहार कोणता, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. महिलांनी नियमितपणे असा आहार घेतल्यास त्यांना येणारा थकवा दूर होईल. तसेच, ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात राहील.
शरीराला लोह खूप आवश्यक असते. यातूनच शरीराला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे लाल रक्तपेशी तयार होतात. त्यामुळे प्रतिकारक्षमता आणि शरीराचे तापमान ठरते. शरीरात पेशींच्या वाढीसाठी लोह गरजेचे असते. अन्न, हिरव्या पालेभाज्या आणि मांसाहारातून लोह मिळते. याच्या अभावामुळे अँनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता होण्याची शक्यता असते. त्यामुळे थकवा, श्वास घेण्यास अडचण येणे, सुस्ती येणे, असे त्रास होतात. तसेच रोगप्रतिकारक्षमता घटते.
मॅग्नेशियम हा घटक शरीरातील स्नायूंसाठी फायदेशीर आहे. तसेच यामुळे पचन संस्था, हृदयाची गती सामान्य राहण्यास मदत होते. रक्तातील शर्करा, रक्तदाब नियंत्रणात राहतो. मधुमेह आणि हृदयरोगासाठीही मॅग्नेशियम फायदेशीर असते. आपल्या शरीराला मॅग्नेशियम हिरव्या पालेभाज्या, शेंगभाज्या, सुका मेवा, धान्य यातून मिळते. शरीरातील ३०० रासायनिक प्रक्रियांसाठी मॅग्नेशियम गरजेचे असते. याचे प्रमाण कमी झाल्यास उलट्या, मायग्रेन, डायरियासारख्या अनेक समस्या निर्माण होतात.
तसेच कॅल्शियमदेखील शरीराला खूप आवश्यक असते. याद्वारे दात व हाडे मजबूत होतात. स्नायू आणि रक्तवाहिन्या आकुंचन व प्रसरण पावतात. त्यामुळे हार्मोन्सचा स्राव योग्य प्रमाणात होतो. कॅल्शियम आपल्याला दूध, चीज, योगर्ट, हिरव्या पालेभाज्यांमधून मिळते. हाडे मजबूत करण्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज असते. वयस्कर लोकांसाठी ते अधिक फायद्याचे ठरते. विशेष म्हणजे वयाच्या ४५ वर्षांनंतर त्याची गरज असते. कारण महिलांची हाडे २२ वर्षांनंतरच कमकुवत होऊ लागतात.
शरीराला ओमेगा ३ ची गरज असते. मेंदूला योग्य पद्धतीने काम करण्यात ते मदत करते. आमेगा ३ हे स्मरणशक्ती आणि सर्व कामे योग्य पद्धतीने करण्यास मदत करते. शरीराच्या हालचालींवरही नियंत्रण राहते. उच्च रक्तदाब कमी करत शरीराचा दाह यामुळे कमी होतो. आमेगा ३ हे मांसाहार आणि जवसातून मोठय़ा प्रमाणावर मिळते. संशोधकांच्या मते ओमेगा ३ मधील पोषक तत्त्वे शरीराचा दाह कमी करण्याबरोबरच हृदयरोग, कॅन्सर, गाठी अशा आजारांवर उपयोगी आहे.