दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हात हा शरीराचा खुप महत्वाचा भाग आहे. हाताशिवाय जगणे हा विचारही आपल्याला सहन होत नाही. अपघातामुळे हात गमावणारांना नंतर जीवनात किती समस्यांना सामोरे जावे लागते हे पाहणे सुद्धा क्लेशदायक ठरते. दररोजची कामे करताना आपण सतत हातांचा वापर करतो. शरीराच्या अन्य अवयवांपेक्षा हाताची हालचाल आपण दिवसभरात सर्वाधिक करतो. घर असो की ऑफिस हाताशिवाय आपले एकही काम होऊ शकते नाही. यावरून दिवसभरात आपले हात किती थकत असतील याची प्रचिती येते. म्हणूनच थकलेले हात रिलॅक्स होणे खूप आवश्यक असते.
हातांना आराम देण्यासाठी बैठे काम करणाऱ्या व्यक्तींनी अधून-मधून हातांना आराम देणारा व्यायाम करावा. संगणकावर काम करणाऱ्याच्या हाताचे कोपरे बऱ्याच कालावधीसाठी एकाच स्थितीत राहतात. अशाने हाताचे स्नायू आखडून दुखण्याचा त्रास होतो. हाताचा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हात समोर करत आरामात बसावे. दोन्ही हात सावकाशपणे मागे घ्या. हातांवर दाब असल्याप्रमाणे मागे घ्यावे. या वेळी हाताची बोटे वरच्या दिशेने असावीत. आता पंजांना खालच्या दिशेने झुकवावे. बोटांची दिशा जमिनीच्या दिशेने करावी. हा प्रकार करताना मनगट एकदम सरळ असावे.
तर हातांचा दुसरा व्यायाम करण्यासाठी प्रथम आरामदायी स्थितीत बसावे. आता उजव्या हाताची मूठ बांधावी आणि अंगठय़ाला इतर बोटांच्या मदतीने दाबावे. आता बंद मुठीला हळूहळू फिरवावे. या वेळी कोपरा आणि हात एका रेषेत सरळ ठेवावे. बसल्या जागी हे दोन व्यायाम केल्यास हातांना चांगला व्यायाम मिळतो. यामुळे हात रिलॅक्स होतात. शिवाय काम करताना हात आखडल्यासारखे अथवा जड झाल्यासारखेही वाटत नाहीत.