आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काळेभोर, लांबसडक आणि चमकदार केस असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते. यासाठी विविध प्रकारचे तेल आणि औषधे महिला घेत असतात. अनेकदा अशा औषधांचाही केसांवर परिणाम दिसून येत नाही. मुळात केसांची योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला हवे तसे केस मिळू शकतात. मात्र, आपल्याच काही चूकांमुळे केसांचे अजाणता नुकसान होत असते. यासाठी आपण वेळीच काळजी घेतली, नियमित केसांची जोपासणा केली तर हवे तसे केस ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता
केस लवकर पांढेर होणे ही समस्या आपल्याकडे सर्रास आढळते. अगदी तरूण वयातही केस पांढरे झालेल्या अनेक मुली व मुले आढळतात. अवेळी केस पांढरे होण्यासाठी हेअर डायमध्ये असलेले केमिकल्स जास्त जबाबदार असतात. त्यामुळे नेहमी चांगल्या कंपनीच्या हेअर प्रॉडक्ट्सचाच वापर केला पाहिजे. अँनिमिया, थायरॉइड किंवा शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असल्यास केस पांढरे होऊ शकतात. तसेच आनुवंशिकता व अन्य आरोग्य समस्यांमुळेदेखील केस पांढरे होतात. हेअर कलर्स किंवा केस रंगवणे इत्यादी अति उपाय केल्यास केसांचे नुकसान होते.
उन्हापासून करा केसांचे रक्षण
सतत कडक उन्हात काम करावे लागत असल्यास सुद्धा केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात. ज्या लोकांचे केस आधीपासूनच पातळ झाले आहेत त्यांच्या डोक्याच्या त्वचेवर सनबर्नही होऊ शकतो. त्यामुळे केसांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर नेहमी कपडा बांधावा अथवा कॅप घालावी. यामुळे केसांचे रक्षण होऊ शकते.
योग्य आहार घ्या
लो कॅलरी डाएटमुळे शरीरात पोषक द्रव्यांची कमतरता भासते. या कारणामुळे केस गळायला लागतात. केसांना प्रथिने, लोह, ओमेगा-३ फॅटी अँसिड्स, झिंक आणि अ जीवनसत्त्वाची गरज असते. जेवणात पालक, गाजर, सुका मेवा, मासे, अंडी आणि सर्व प्रकारच्या धान्याचा समावेश केल्यास केसांची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.