आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ‘मदरहूड हॉस्पिटल्स आणि स्फेरुल फाउंडेशन’ या संस्थेला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रमाणपत्र मिळाले आहे. २४ एप्रिल २०१९ रोजी केंद्रीय विद्यालयात मासिक पाळीतील वैयक्तिक स्वच्छतेबाबत सर्वात मोठे सत्र या संस्थेने आयोजित केले होते. या सत्रात ३०० किशोरवयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ही संस्था महिला सबलीकरण व आरोग्यासाठी अनेक विकासात्मक व शैक्षणिक कार्यक्रम राबवणारी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेने ज्या विक्रमात सहभाग घेतला, तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स डेटाबेसमधील ४०,००० विक्रमांपैकी एक आहे.
सत्रातील उपक्रम –
मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियांपैकी एक असते. या दरम्यान खूप खबरदारी बाळगणे तसेच स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असते. दर महिन्याला होणाऱ्या रजस्रावाच्या कठीण काळात योग्य पद्धतीने वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे. मासिक पाळीसंदर्भातील स्वच्छतेच्या आवश्यक बाबींविषयी जागरूकता नसल्यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे, योनीमार्ग तसेच मूत्रमार्गाला प्रादुर्भाव होणे, वंध्यत्व तसेच प्रजनन आरोग्यासंदर्भातील अन्य काही समस्या निर्माण होऊ शकतात. याविषयी महत्वाची माहिती देण्याचे संस्थेने केले. या विशेष आणि मोठ्या सत्रासाठी संस्थेने गिनीज जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्राप्त केले.
खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलच्या संचालीका डॉ. कृष्णा मेहता यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की , ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे या कार्यक्रमाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. मदरहूड हॉस्पिटल एक रुग्णालयांचा कॉर्पोरेट समूह म्हणून समाजाच्या, विशेषत: स्त्रिया व मुलांच्या हितासाठी, असे उपक्रम राबवत आहे ही अभिमानाची व सन्मानाची बाब आहे.’
या विशेष उपक्रमात भाग घेतल्याबद्दल खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग विभागातील कन्सल्टंट डॉ. राजेश्वरी पवार प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की , ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यक्रमात भाषण देण्यासाठी मला बोलावण्यात आले. याशिवाय, तरुण मुलींना आजपर्यंत जे धडे कधीच दिले गेले नाहीत, ते देण्याची संधी मिळाली. जीडीडब्ल्यूआरचा भाग होण्याची ही अविस्मरणीय संधी दिल्याबद्दल मी माझ्या संस्थेचे, मदरहूड ग्रुप हॉस्पिटल्सचे, मी आभार मानते.’
स्फेरुल फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. गीता बोरा यांनी सत्राविषयी माहिती देताना सांगितले की , ‘संस्थेने भारतभरातील शाळांमध्ये संपूर्ण वर्ष मासिक पाळीदरम्यानचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता या विषयावर सत्रे घेतली. मात्र हे सत्र निराळे होते, कारण याद्वारे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा कार्यक्रम गिनीज मार्गदर्शक तत्त्वांनुसार परिपूर्ण असणे आवश्यक होते आणि त्याचवेळी डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही काटेकोर पालन करावे लागले. मासिक पाळी विषयाभोवती उगाचच निर्माण झालेली गुप्तता आणि कलंक मोडून टाकण्याचा प्रयत्न या विक्रमाद्वारे केला.