पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन- सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, पॅरालिसिस, अर्धांगवात किंवा अर्धांगवायू. ही सर्व समान नावे आहेत. विशेषतः वृद्धापकाळात होणारा हा वातविकार आहे. परंतु ,या आजाराने सध्या तरुणाईला ग्रासले आहे. सध्या अनेक तरुणांना पक्षाघात झालेला आढळून येत आहे. यात संपूर्ण शरीराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूचे अंग पूर्णतः किंवा अंशतः निष्क्रिय होते. परिणामी त्या बाजूच्या हालचाली पूर्णपणे नष्ट होतात. म्हणजेच त्या भागातील कर्मेंद्रियांची हानी होते.आजकालच्या वेगवान व धकाधकीच्या जीवनात माणसाला सतत ताणतणावांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्याला कमी वयातच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार या तीन प्रमुख रोगांनाही सामोरे जावे लागत आहे. या तिन्ही घातक व्याधींचे वेळीच निदान व चिकित्सा न झाल्यास पुढे या रोगांचा दुष्परिणाम म्हणून पक्षाघाताची संभावना वाढत आहे. त्यामुळे या आजाराकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.
* पॅरालिसिसची कारणे खालीलप्रमाणे *
१) मेंदूगत रक्तस्राव हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. यामध्ये मस्तिष्कगत संसर्गामुळे मेंदूला सूज येऊन रक्तस्राव होतो.
२) एखाद्या बाह्य आघाताने मेंदूत रक्तस्राव होणे, विषबाधा होऊन मेंदूत रक्तस्राव होणे, ट्यूमरमुळे रक्तस्राव होऊन अचानक पक्षाघात निर्माण होतो.
३) एखादी शस्त्रक्रिया करताना देखील पक्षाघात होण्याची शक्यता असते. जसे हृदयावरील शस्त्रक्रिया, छातीच्या भागातील शस्त्रक्रिया, मानेची शस्त्रक्रिया यामुळे पक्षाघात होऊ शकतो.
४) दीर्घकाळपर्यंत मेंदूच्या आवरणात रक्ताची गाठ असली. तर यामुळेही पक्षाघात होऊ शकतो.
* पॅरालिसिस या आजार टाळणयासाठी उपाय खालीलप्रमाणे *
१) पक्षघात होऊ नये म्हणून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
२) पक्षाघाताला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून धूम्रपान आणि मद्यपान कटाक्षाने टाळा.
३) आपले वजन वाढले तर पक्षाघात होऊ शकतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा.
४) हा आजार होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
५) आपल्याला हा आजार जर टाळायचा असेल तर मधुमेह नियंत्रणात ठेवावा लागेल.