बीडमध्ये गर्भपिशवी शस्त्रक्रियेच्या नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक
बीड : आरोग्यनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या महिला केवळ मजूरीसाठी मोठ्याप्रमाणात गर्भपिशवी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी माध्यमांनी उघड केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. मजूरी देणारे ठेकेदारही महिलांना ही शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगत असल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून बीड जिल्ह्यात गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेवर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी रूग्णालयांसाठी ही नियमावली तयार करण्यात आली असून या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केले गेले तर संबंधीत रूग्णालयाची मान्यता रद्द करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी दिले आहेत. यासंदर्भात सर्व रूग्णालयांना देण्यात आलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की, खाजगी रूग्णालयांनी गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करताना त्या महिलेला सर्व कागदपत्रांसह संबंधित तालुक्याचे वैद्यकीय अधिक्षक अथवा जिल्हा चिकित्सक यांच्याकडे तपासणीसाठी पाठवून परवानगी घ्यावी.
तातडीच्या वेळी अशी शस्त्रक्रिया केली गेल्यास २४ तासांच्या आत जिल्हा शल्य चिकित्सक यांना याबाबत माहिती दिली पाहिजे. वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा चिकित्सक यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या रूग्णाला गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया आवश्यक आहे की नाही याचा अहवाल तत्काळ कळवावा. या शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रूग्णलयांनी एक दिवस निश्चित करावा. आणि तो दिवस द्यकीय अधिक्षक, जिल्हा चिकित्सक यांच्या कार्यालयाला देखील कळवावा.
बीड जिल्ह्यात कारण नसताना महिलांच्या गर्भपिशव्या काढून टाकण्यात आल्या आहेत. हे चुकीचे असून यासंदर्भात डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे. मुळात हे महिलांच्याच बाबतीत नाही तर पुरूषांचीही अपेंडिक्सची शस्त्रक्रिया केली जात आहे. डॉक्टर पैसे कमावण्यासाठी रुग्णांना भय दाखवून शस्त्रक्रिया करतात. हे पहिल्यांदा बीडचे प्रकरण उघडकीस आले आहे. पण सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही हेच सुरू आहे. पैसा कमाविण्यासाठी काही डॉक्टरांनी हा मार्ग पत्करला आहे.