डोकेदुखीकडे दुर्लक्ष ; जीवावर बेतले असते पण सुदैवाने वाचले प्राण

headche

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वेळीच केलेल्या उपचारांमुळे एका रूग्णाचे प्राण वाचले आहेत. या रूग्णाने डोकेदुखीकडे दुर्लक्ष केले आणि शेवटी बेशुद्ध होऊन पडल्यानंतर त्यास ग्लोबल हॉस्टिटलमध्ये दाखल करण्यात आले. थोडादेखील उशीरा झाला असता तर हा रूग्ण ब्रेन डेड झाला असता, असे येथील डॉक्टरांनी सांगितले. सुदैवाने या रूग्णाचे प्राण वाचले असून त्यास डिस्चार्जही देण्यात आला आहे. थोडक्यात, डोकेदुखी, उलटी, ताप हे किरकोळ आजार वाटत असले तरी ही काही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. यासाठी वेळीच डॉक्टरांकडे गेले पाहिजे. ग्लोबल हॉस्पिटलमधील या रूग्णाचे प्राण कसे वाचले ते पाहुयात.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २९ वर्षांचे गणेश भोर डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. डोकेदुखीमुळे काम करणे, दैनदिन क्रिया करणेही नंतर त्यांना अवघड होऊन बसले. अनेक दिवस हा त्रास असाच सुरू असताना अचानक ते २२ मार्च रोजी बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आल्यानंतर येथील डॉक्टरांनी त्यांचे त्यांचे सीटी स्कॅन केले. यामध्ये त्यांच्या मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा झाल्याचे दिसून आले. मेंदूतील द्रवावर अतिरिक्त दाब निर्माण होत होता. यास अ‍ॅक्युट हायड्रेसेफेलस म्हणतात. यानंतर गणेश भोर यांना रुग्णाला इनट्युबेट करण्यात येऊन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याची एमआरआय चाचणी करण्यात आली असता मेंदूच्या केंद्रावर कोलॉइड सिस्ट (पुळीसारखा प्रकार) आढळले.

पुळीमुळे दाब वाढत असल्याने सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) मेंदूतून बाहेर जाऊ शकत नव्हते. ते मेंदूतच राहिल्याने मेंदूतील दाब वाढला आणि हा रुग्ण बेशुद्ध झाला. या रुग्णावर लगेच उपचार करणे आवश्यक असल्याने डॉ. नितीन डांगे आणि डॉ. पंकज अगरवाल यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.या शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले की, कॅज्युअल्टीमध्ये इमर्जन्सी व्हेन्टिक्युलर टॅप तयार करण्यात आला. त्याने नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफेलसमधील (रक्तवाहिन्यांना जोडणाऱ्या मार्गात निर्माण होणारा अडथळा) सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा निचरा केला. त्यानंतर दाब कमी झाला आणि रुग्ण शुद्धीवर आला. त्यानंतर व्हेन्टिक्युलोपेरिटोनिअल शंट करण्यात आले.

त्याचप्रमाणे सीएसएफच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे अर्बुद (पुळी) मायक्रोसर्जरी करून काढून टाकण्यात आली. यानंतर शस्त्रक्रियेच्या चौथ्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. सुदैवाने या रुग्णावर वेळेवर उपचार झाले. अन्यथा तो ब्रेनडेड झाला असता. त्यामुळे डोकेदुखी, उलटी किंवा अशी कोणताही लक्षणे दिसली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जीवावर बेतले असते. पण ते सुखरूप बचावले हा चमत्कारच होता. आता या रूग्णाची प्रकृती सामान्य झाली आहे, असे डॉ. डांगे म्हणाले.