आधुनिक युगातही ‘मासिक पाळी’बाबत महिलांची मानसिकता पूर्वीप्रमाणेच
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजच्या आधुनिक, प्रगत युगातही आपल्याकडील महिलांमध्ये मासिक पाळीबाबतचे अनेक गैरसमज तसेच आहेत. तरूण मुली, महिला अजूनही मासिक पाळीबाबत उघडपणे बोलताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे भाेवतालच्या वातावरणामुळे आजही महिला मासिक पाळीत स्वत:ची काळजी घेताना दिसत नाहीत. अनेक महिला स्वच्छता आणि इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करतात. कुटुंबातील मोठ्या व्यक्ती मुलींना मासिक पाळीशी संबंधित इन्फेक्शन झाल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन जात नसल्याचे दिसून येते. अंगावरून भरपूर प्रमाणात पांढरे पाणी जात असल्यास गांभीर्याने घेतले जात नाही. खरे तर अशावेळी ताबडतोब डॉक्टरकडे गेले पाहिजे. आजही आपल्याकडे महिला आणि मुलींसह त्यांच्या कुटुंबियांमध्ये मासिक पाळीबाबत जागृती करण्याची गरज भासत आहे.
याबाबत जनजागृती करण्यासाठी बंगलोरमधील ‘सुखीभवन’ संस्था दरवर्षी काही मुलींना फेलोशिप देते. या फेलोशिप अंतर्गत पुण्यात ३ तरुणी मासिक पाळीसंदर्भात जनजागृती करण्याचे काम करत आहेत. हे काम करणाऱ्या मुली सांगतात की, फॅक्टरीमध्ये बनवलेले पॅड चांगले असतात अशी मार्केटिंग केली जाते, काही एनजीओदेखील अशी मार्केटिंग करत आहेत. घरगुती बायाेडिग्रेडेबल पॅड्स किंवा कापड वापरण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. सुमारे ९९ टक्के महिलांना वाटते की मासिक पाळीचे रक्त अशुद्ध असते. याशिवाय मासिक पाळीत आपण अशुद्ध असल्याने मंदिरात जाऊ नये, जेवण बनवू नये, असा समज आजही कायम आहे. आजही मुली मासिक पाळी बाबत उघड बोलत नाहीत. प्रथमच पाळी येते तेव्हा मुली घाबरतात. मासिक पाळीत कोणते पॅड वापरावेत याबाबतही महिलांमध्ये जागृती करण्याची गरज आजही भासत असल्याचे दिसून येत आहे.