दातांच्या आरोग्यरक्षणासाठी…

teeth

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील एक दुर्लक्षत राहणारा घटक म्हणजे दात. ते सुस्थितीत असेपर्यंत फारशी काळजी घेतली जात नाही. मात्र दुखणी उद्भवू लागल्यानंतर मात्र त्यांची खरी किंमत कळते. दातांवरचे विविध उपचार प्रचंड महाग असतात. म्हणूनच दातांची अनास्था टाळायला हवी. दातांच्या आरोग्यावर कोणत्या गोष्टींचा दुष्परिणाम होतो हे जाणून घ्यायला हवं.

आम्लांमुळे होणारी झीज हे दातांच्या समस्येचं मुख्य कारण आहे. फळांचे रस तसंच सोडा प्यायल्याने दातांवर परिणाम होतो. अशा साखरयुक्त आणि आम्लयुक्त पेयांमधून तोंडात काही घटक सोडले जातात. या घटकांमुळे आम्लाची निर्मिती होते आणि त्यामुळे दातांवरचा संरक्षित थर कमी होतो. आम्लाच्या या हल्ल्याचा प्रतिकार करण्याची क्षमता लाळेत असते. लाळेमुळे सायट्रिक अँसिडचा प्रभाव कमी होतो. म्हणूनच लाळेची निर्मिती करण्यासाठी शुगर फ्री चुईंग गम खाण्याचा सल्ला डेंटिस्ट देतात.

दातांवर दुष्परिणाम करणारं आणखी एक कारण म्हणजे ब्रुक्सिझम. ब्रुक्सिझम म्हणजे दात कराकरा वाजणं. वय वाढलं कि झोपेत दात कराकरा वाजतात. यामागील नेमकं कारण माहीत नसलं तरी हे दातांसाठी योग्य नाही. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे दातांवर डाग पडतात. धूम्रपानामुळेही दात खराब होतात. त्यामुळेच अशा वाईट सवयी सोडल्या पाहिजेत. पांढरेशुभ्र दात हवे असतील तर सिगारेटपासून कटाक्षाने दूर रहायला हवं.