निरोगी आरोग्यासाठी : तुमचा संयम हाच महत्त्वाचा
आरोग्यनामा ऑनलाइन – रात्रंदिन युद्धाचा प्रसंग, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही उक्ती अलिकडे आपल्या दैनंदिन जीवनात खरी होऊ पाहत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. प्रत्येकाला रोजच्या जीवनात अनेक वेळा, अनेक आघाड्यांवर युद्ध खेळण्याचाच प्रसंग येतो. मागे वळून पाहिले तर अर्जुनाच्या काळापासून आतापर्यंत ताणतणाव आहेतच. आपण सर्वजण आधुनिक अर्जुनच आहोत. आपले जीवन एक धर्मक्षेत्र व कुरुक्षेत्रच बनले आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनाबरोबर युद्ध खेळावे लागत आहे. ते थांबविण्यासाठी प्रथम मनाला शांत ठेवले पाहिजे. कारण त्याच्यावर कुठलेही औषध नाही. कारण तिथे तुमचा संयम हाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुमचे धर्मग्रंथ, योगशास्त्र, अध्यात्मशास्त्रच मनाची टॉनिक आहेत, हे विसरून चालणार नाही.
प्रत्येकाला वाटते आपले आरोग्य निरोगी असले पाहिजे. चांगल्या गोष्टी हव्या असतात त्यासाठी चांगल्या सवयी लावून घेणे गरजेचे आहे. प्रथम तुमचे मन निरोगी ठेवण्यासाठी काळजी घ्या. खंबीर व निरोगी मनामुळे अनेक व्याधींना आपण सहज दूर करू शकतो, त्यासाठी तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. जीवनाचा खरा आनंद मिळवायचा असेल तर गरजा मर्यादित असल्या पाहिजेत आणि बाह्य सुखाच्या मागे धावण्यापेक्षा आत्मिक सुखाकडे लक्ष दिले पाहिजे.
उत्तम आरोग्य राखण्यासाठी सातत्याने व्यायाम आणि नियमित आहार गरजेचा आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात हे शक्य आहे का, असे म्हटले तर प्रत्येकजण म्हणतो वेळ मिळत नाही. काम भरपूर पडली आहेत. इकडे जायचे आहे तिकडे जायचे आहे. धावपळ करायची असेल तर निरोगी शरीर असेल तरच शक्य आहे हे सोयीस्कर आपण विसरतो. जीवनामध्ये जे काही साध्य करायचे आहे, त्याला साथ देणारे तुमचे शरीर निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे.
अलिकडे आरोग्याबाबत जागरूकता वाढलेली आहे. एखादे जादुई बटण दाबून झपट आरोग्य मिळवता येत नसले तरी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचे बटण दाबून आरोग्यपूर्ण माहिती मिळवणे शक्य झाले आहे. एकविसाव्या शतकातील पिढी अर्थच्या मागे पळतच जीवनाचा अर्थ लवकर संपवीत असल्याची उदाहरणे आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. धावपळ करून जीवनात धन मिळविता येईल. मात्र त्या धावपळीत महत्त्वाचे आरोग्य धन गमाविण्याची वेळ अनेकांवर आली आहे. म्हणूनच धन मिळवताना आरोग्य धनाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. महत्त्वपूर्ण असलेले आरोग्यधन हे पैसा देऊन मिळणार नाही किंवा कुणाकडून लुबाडून घेता येणार नाही हेही तितकेच खरे. त्यासाठीच आयुष्यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारचे धन (पैसा व आरोग्य) हवे असेल तर आरोग्याला सर्वाधिक प्राध्यान्य द्यायला शिकले पाहिजे.
स्पर्धात्मक जगामध्ये धावण्याच्या नादात आपण आपल्या आरोग्याकडे सहजात दुर्लक्ष करून जातो. बहुतेक वेळा जेवण वेळेवर घेत नाही आणि व्यायामाचे म्हणाल तर वेळ नाही असे सहज सांगून टाकतो, असे वागून आता चालणार नाही. जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर भरपूर काम करा, अधूनमधून मनसोक्त जेवणाचा आनंद घ्या, कधी तरी टीव्हीही पाहा. एखाद्या दिवशी रात्रीचा दिवस करा, कधीतरी गोडही खा, भरपूर शॉपिंग (पैसे असल्यास) करा, आरशात पाहून खळखळून हसा वा कोणाला तरी हसवा, चेष्टामस्करी विनोदही करा. एखाद्या दिवशी भिकार्यालाही तुमचे कपडे द्या, दानधर्म करा, जेवण द्या, देवळात जा, चर्चमध्ये जा, मशिदीत बसा, रुटीन सोडून बाहेर पडा. दोन-चार दिवस लांब कोठेतरी जा, चार दिवस माहेरी वा सासरी जा, एक आठवडाभर मोबाईल बंद ठेवा, काही फरक पडत नाही.
कधी तरी एक दिवस मौन पाळा, उपवास करा, वेगळे कपडे घालून फिरायलाही जा. नाटक वा सिनेमा पाहा, आवडीची पुस्तके वाचा नाही जमल तर निदान चाळा तरी. वर्षभरासाठी सामाजिक कार्ये निवडा व आनंदाने करण्याचा प्रयत्न करा. कधीतरी पैसे न घेता काम करा. एखादी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला निखळ आनंद मिळेल. असे करत असताना बघा तुमच्यातील बदल कसा होईल आणि तुमच्यातील व्याधी कधी पळून जातील ते तुम्हाला समजणारसुद्धा नाही. अशा वागण्या-बोलण्यामुळे तुम्हाला सारे जगच बदललेेले दिसेल आणि तुम्ही आनंदी जीवन जगत असल्याचा आनंदही द्विगुणीत होईल.
तुम्ही बदललात की तुमच्या मेंदूतील व शरीरातील सर्व पेशी सुखावतील व तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत उत्तम आरोग्य लाभेल. अतिव्यायाम व योगासने गरजेचेपुरतीच करा. भौतिक जीवनशास्त्राला विश्वाच्या उर्जेबद्दल फक्त 5 टक्के माहिती आहे. पण आपण 95 टक्के ऊर्जेचे व्यवस्थापन करून जगू शकतो. ही ऊर्जेचे मोजमाप नाही. अणुउर्जा, गुर्त्वाकर्षणाची शक्ती व विद्युत चुंबकीय शक्ती या तीन प्रकारच्या ऊर्जा वा शक्तीच फक्त पाच टक्क्यांमध्ये समाविष्ट आहेत.
आनंदी जीवन जगताना आपण कळत-नकळत अत्यंत सूक्ष्म लहरींद्वारे या ऊर्जेचे म्हणजेच उरलेल्या 95 टक्के ऊर्जेचे भन्नाट व्यवस्थापन रक्षण, बंधन व संतुलन करीत अशतो. कोणत्याही व्यायामापेक्षा हे अत्यंत प्रभावी ठरू शकते. स्व चा अभ्यास प्रत्येक गोष्टीतून, कामातून, व्यवहारातून केला पाहिजे. त्यासाठी सन्यास घ्यायला नको, संसार सोडायला नको, धर्म सोडायलाही नको, कोणत्याही बुवाच्या, महाराजांच्या किंवा एखाद्या देवतेच्या मागे लागण्याची गरज नाही, व तवैकल्येही नको आहेत.
दिवसाच्या शेवटी स्वस्थ चित्त झालात तरच स्वास्थ्य मिळेल आणि जीवनातील सत्व कळेल. स्व-त्त्वाकडे जाल तरच स्वामित्व मिळेल. तुम्ही बदलला की आऱोग्य मिळेल ते अवघ्या कमी परिश्रमात. थोर मंडळींचे आणि घरातील वडिलधार्या मंडळींचे आशीर्वाद घ्या व त्यांचा सांभाळ करा खरे सुख तेथेच आहे. आपल्याला जन्मदात्यांकडून मिळालेल्या देहाबरोबर आपल्या इच्छा-शक्ती नावाची एक अगम्य शक्ती ईश्वराने दिली आहे, त्याचा योग्य वापर करायला शिका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याकडे थोडे लक्ष दिले तरी नक्कीच निरोगी आरोग्य जगण्याचा आनंद तुम्हाला मिळण्यास मदत होईल.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मानवाने केलेली प्रगती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्याबाबत संपूर्ण माहिती आहे, असे नाही. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या आरोग्याविषयी व अस्तित्वाबद्दलचे अज्ञान आजही तेवढेच आहे. आयटी क्षेत्रातील तरुणांच्या आरोग्याच्या समस्या अतिशय भयानक आहेत, असे मत नोबल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने व डॉ. मंगेश लिंगायत यांनी व्यक्त केले. नैराश्य, अपचन, हाडांची. अऩेकविध दुखणी (पाठ, मान, खांदे, कंबर, गुडघा) इत्यादी. त्याचबरोबर श्वसन, नंपुसकता, वंध्यत्व, घटस्फोट, काही प्रमाणात आत्महत्या, कर्जबाजारीपणा, विस्मरण, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढते वजन, तरुण मुलींच्या मासिक धर्माच्या तकारी, डोकेदुखी आणि डोळ्यांचे आजार अशा अनेकविध आजारांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे.
डॉ. प्लाविनी पायगुडे – निकम