आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पांढरेशुभ्र दात आपले व्यक्तीमत्व खुलवतात. शिवाय आरोग्यही यामुळे चांगले राहते. मात्र, पिवळे दात हे चांगले लक्षण नसून यामुळे समोरच्यांवर वाईट प्रभाव पडतो. शिवाय, तोंडाच्या अस्वच्छतेमुळे अनेक आजारही होतात. दात हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दात कमकुवत किंवा दुखत असल्यास आहारसुद्धा नीट घेता येत नाही. यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक आहे.
पांढरेशुभ्र आणि मजबूत दात हवे असतील, तर कोणते उपाय करावेत याची माहिती आपण घेणार आहोत. चीज आणि पनीर दातांसाठी खूप फायदेशीर आहे.चीज आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते, जे दातांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे. दात किडले असल्यास दररोज चीज किंवा पनीरचा एक छोटासा तुकडा खावा. यामुळे दातांची कीड दूर होते. कोको दातांसाठी खूप पोषक मानले जाते. यामधील तत्वांमुळे हिरड्या सुजणे आणि दाड किडण्याचा धोका दूर होतो. संपूर्ण दिवस तणावात जात असेल तर संध्याकाळी चॉकलेटचा एक तुकडा खाल्यास तणाव हलका होतो. शिवाय, दातांच्या आजारातून मुक्ती मिळेल.
नाशपती हे फळ दातांची स्वच्छता तसेच दात शुभ्र आणि मजबूत करण्याचे काम करते. तसेच हिरड्या आणि दात मजबूत करण्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे चांगले आहे. सफरचंद खाल्ल्याने दातांची स्वच्छता होते. तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होते. यामुळे दातांमध्ये कीड निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. शिवाय, तीळ चावून खाणे दातांसाठी लाभदायक आहे. तिळामधील कॅल्शिअममुळे दात मजबूत होतात तसेच दातांमध्ये जमा झालेले प्लाक, कॅल्क्युलस, अन्नकण या सर्वांपासून मुक्तता मिळते.
दररोज एक ग्लास दुध पिल्याने दातांना खूप लाभ होतो. दात मजबूत आणि पांढरे होतात. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. किवी फळ व्हिटॅमिन सीचे एक उत्तम स्रोत आहे. शरीरात संतुलित मात्रेत व्हिटॅमिन सी असेल तर कोलेजनचा स्तर कायम राहतो. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात. तसेच दररोज कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात, दात किडण्याची समस्या दूर होते.
दातांसाठी कच्चा कांदा फार लाभदायक आहे. कच्च्या कांद्यामुळे दातांचे नुकसान करणारे किटाणू नष्ट होतात. दररोज एक ग्लास संत्र्याचा ज्यूस पिल्यास शरीराला व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम मिळते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. तसेच बॉडी एनर्जी संतुलित राहते. दररोज जेवण झाल्यानंतर थोडासा ओवा खाणे दातांसाठी लाभदायक आहे.