आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन वाढण्याची समस्या सध्या बहुतांश जणांना सतावते आहे. वजन वाढले की अन्य आजारही त्रस्त करून सोडतात. यासाठी अनेक जण व्यायाम, डाएट असे उपाय करत असतात. परंतु, धावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यायाम करण्यासही वेळ मिळत नाही. आहारावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर फेंगशुईच्या काही खास उपायांनी तुम्ही वजन कमी करू शकता. चीनी वास्तूशास्त्रामध्ये हे उपाय सांगण्यात आले आहेत. उर्जेचा प्रवाह व्यवस्थित असल्यास आरोग्य चांगले राहते, असे या शास्त्रात सांगितले जाते. या उपायांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत खास उपाय
* जेवणावर ताव मारणे चांगले नाही. जेवण करण्यापूर्वी संतुष्टीची इच्छा करावी. यामुळे जेवण स्वास्थ्यवर्धक होते. तसेच कोणताही विकार उत्पन्न होत नाही, असे फेंगशुई शास्त्रात सांगितले आहे. जास्त खायचे नसेल तर किचन आणि डायनिंग टेबलवर ताजी फळे ठेवा.
* सूर्यप्रकाश सरळ किचन किंवा डायनिंग भागाला पाहिजे. तसेच डायनिंग टेबल किंवा फ्रीजसमोर आरसा लावा. यामुळेआहार पोषक आणि आरोग्यवर्धक होऊन शरीराची कार्यप्रणाली व्यवस्थित चालते.
* फेंगशुईमध्ये आणखी एक थोडा विचित्र उपाय सांगितला आहे तो म्हणजे, बुटांकडे पाहूनही वजन कमी केले जाऊ शकते. बूट सतत दिसतील अशा ठिकाणी ठेवावेत. बूट स्वच्छ, साफ केलेला आणि नवीन असावेत. तसेच निरोगी, प्रसन्न व्यक्तींचे फोटो घरात लावावेत. याचा परिणाम आरोग्यावर पडत असतो.
* स्वयंपाकघराच्या साफ-सफाई, स्वच्छतेसोबतच सजावटीकडेही लक्ष द्यावे. अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. स्वयंपाक घराला फिकट रंग असावा. टेबलवर काळ्या, निळ्या रंगाच्या प्लेट्स तसेच टेबल क्लोथ वापरावे. यामुळे आहार कमी घेतला जातो.
* बेडरूम स्वच्छ ठेवावी. कपाटात कपडे व्यवस्थित ठेवावे. अस्ताव्यस्त वस्तू आवरून ठेवाव्यात. यामुळे फेंगशुई उर्जेचा चांगला प्रभाव शरीरावर होतो.