आरोग्यनामा ऑनलाइन – राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने ऑनलाईन फूड कंपन्यांसाठी नियमावली तयार केली आहे. अन्न पदार्थ तयार करताना काही विक्रेते नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून येत असल्याने ऑनलाईन फूड कंपन्या, हॉटेल्स यांना एफडीएने काही सूचना केल्या आहेत. एफडीएने या विक्रेत्यांची एक बैठक घेतली होती. या बैठकीत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या कंपन्यांसाठी नियमावली सादर केली.
या बैठकीत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या कंपन्यांना ८३ पानांची नियमावली सादर केली. येत्या दोन महिन्यांत सर्व कंपन्यांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. अन्यथा एफडीए कठोर कारवाई करवाई करणार आहे. काही पिझ्झा-बर्गर विकणाऱ्या ऑनलाईन फूड कंपन्या अस्वच्छ जागेत खाद्यपदार्थ तयार करत आहेत. काही हॉटेल्सकडे विक्रीचा परवाना नसतानाही ऑनलाईन फूड कंपन्यांद्वारे खाद्यपदार्थ विकले जात आहेत. एफडीएच्या तपासणीत हे उघड झाल्यानंतर ही नियमावली करण्यात आली आहे.
पिझ्झा, बर्गर, डॉमिनोज, स्विगी, झोमॅटो, बर्गर किंग, मॅक्डोनाल्डस या ऑनलाईन फूड कंपन्यांना एफडीएने बैठकीसाठी बोलावले होते. यात परवान्यांचे नुतनीकरण झालेले असावे, स्वच्छ जागेत अन्न तयार करावे, फूड डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करावी, अन्न पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजच्या वाहनांचा परवाना असला पाहिजे, याबाबत त्यांना सांगण्यात आले. ऑनलाईन फूड कंपन्यांमार्फत ग्राहकांना चांगले खाद्यपदार्थ पुरवले जावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे, असे एफडीएच्या अन्न विभागाचे सह-आयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितले.