सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सिगारेटच्या धुरामुळे थेट फुफ्फुसावर परिणाम होते हे सर्वश्रुत आहे. परंतु, सिगारेटमुळे डोळ्यांवरही खूप परिणाम होतो. एका संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, धूम्रपान न करणारी व्यक्ती सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आल्याने डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात.
धूम्रपान करताना बाहेर सोडण्यात येणारा धूर हा प्रचंड विषारी असतो. या धुरामुळे शरीरातील विविध अवयवांवर परिणाम होतो. त्यातच कॉर्निया संवेदनशील असल्यानं त्यालाही संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींना हा त्रास अधिक होतो. या धुरामुळे डोळ्यांना त्रास होत असल्याचे समजत नाही. यामुळे रूग्ण उपचारही करत नाहीत. शहरात याचा परिणाम अधिक जाणवतो. तंबाखू आणि सिगारेटच्या अतिरिक्त सेवनामुळे कर्करोगाची लागण होते. तसेच सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे डोळ्यांचे विकारदेखील होतात.
सिगारेटच्या धुरामुळे डोळ्यावर होणारा परिणाम, यावर संशोधकांनी संशोधन केले असता यातून असे दिसून आले की, धूम्रपानामुळे बाहेर पडणाऱ्या घातक रसायनांमुळे डोळ्याच्या कॉर्नियाला संसर्ग होतो. जामा ऑप्थॅल्मोलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. संशोधकांनी १९८३ व्यक्तींचा अभ्यास केला. यामध्ये १०२८ महिला आणि ९५५ पुरुष होते. १० वर्ष हा अभ्यास सुरू होता. यापैकी एक चतुर्थांश लोकांच्या रेटिनावर सिगारेटच्या धुराचा परिणाम झाल्याचे आढळले. तंबाखूच्या धुरात अनेक प्रकारची घातक रसायने असतात. त्याच्या संपर्कात अधिक काळ राहिल्यास डोळ्यांना अनेक प्रकारचे त्रास होतात. काही लोकांना अंधूक प्रकाशात चावीने कुलूप उघडतानाही त्रास होतो. डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स किंवा डोळ्यांवर चष्मा असला तरी काही फरक पडत नाही. कॅडमियम आणि शिसे हे धातू डोळ्यांच्या रेटिनात जमा होतात आणि त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.