आरोग्यनामा ऑनलाईन टीम – संगणक, मोबाईल, टीव्हीवर सतत नजर खिळवून ठेवल्यामुळे डोळे आणि मेंदूवर खूप ताण येतो. या साधनांमुळे निघणाऱ्या विद्युत लहरींचा डोळ्यांवर दुष्परिणामही होतो. या सवयीमुळे डोळ्यांचा थकवा, बौद्धिक कंटाळा व शरीर आखडणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरू होतात.
डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी उपाय
डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी मंद प्रकाश असलेल्या एकांतातील खोलीत बसा. दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून ते झाकून घ्या. बंद डोळ्यावरील बाहुल्यांना हाताने हळुवार स्पर्श करा. आपल्या हातात मोरपंख आहेत व त्याने आपण डोळ्यांना स्पर्श करत आहोत, अशी कल्पना करा. डोळ्यांवर कोणताही ताण येऊ देऊ नका, ताण आल्यास संपूर्ण प्रक्रिया व्यर्थ ठरेल. ही प्रक्रिया खूप सावधानतेने करावी. सुरुवातीला हातांनी डोळ्यांवर थोडा दाब टाकला जातोच. मात्र, हळूहळू दाब कमी करत गेल्यास एक क्षण असा येतो की हाताचा केवळ एक स्पर्श जाणवतो.
ही काळजी घ्या
डोळ्यांवर हातांचा दाब पडल्यास या प्रक्रिया परिणामकारक ठरणार नाही. डोळ्यांतून बाहेर पडणारी ऊर्जा अत्यंत नाजूक असते. थोडा जरी दाब असला तरी ती संघर्ष करू लागते. त्यामुळे प्रतिरोध निर्माण होतो. हाताने दाब दिल्यास डोळ्यांतील ऊर्जेचा संघर्ष सुरू होतो. हलक्या हाताने स्पर्श केल्यास डोळ्यातील ऊर्जा माघारी फिरते. ही ऊर्जा परत जाऊ लागल्यावर संपूर्ण चेहरा आणि कपाळावर हलकेपणाची जाणीव होते. मनशांत होते. ही परत येणारी ऊर्जाच हलकेपणाचा अनुभव देते.