आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर पीळदार, सुडौल होण्यासाठी अनेकजण व्यायाम करतात. हजारो रूपये भरून जीम सुरू करतात. मात्र, लवकरच हे नियोजन कोलमडून पडते. कारण, जीम सुरू केल्यानंतर लवकरच आपले शरीर पीळदार होणार एवढेच स्वप्न बघितलेले असते. अशा पद्धतीमुळे अनेकांचा भ्रमनिरस होतो. आणि लवकरच जीममध्ये जाणे बंद केले जाते. यासाठी व्यायामाचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे. व्यायामाची वेळ, प्रकार याचे नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास लवकर फायदा दिसून येऊ शकतो.
शारीरीक क्षमता वाढवण्यासाठी वेट ट्रेनिंगचा कालावधी आणि स्नायूंचा आकार वाढवण्यासाठी सेट्स किंवा रेप्स वाढवावेत. तसेच सहनशीलतेसाठी सेट्स किंवा रेप्समध्ये आणखी वाढ करावी किंवा सेट्सच्या मध्ये आराम कमी करावा. हेवी रेझिस्टन्स विरुद्ध जोर लावल्याने स्नायू मजबूत होतात. वॉर्म-अपनंतर आपल्या क्षमतेच्या ६० टक्के वजन उचलावे आणि १५ किंवा जास्त रेप्स करावे. नंतर वजन वाढवा आणि रेप्स कमी करावे. त्यानंतर ८० टक्के वजन उचलावे, ५-६ रेप्स करा, जेणेकरून इजा होणार नाही.
तसेच जिमचे सदस्यत्व, साहित्याची बॅग किंवा बाटलीपैकी एकही वस्तू विसरल्यास व्यायाम न करण्याचा बहाणा काही जण करतात. त्यामुळे सर्व साहित्य आठवणीने सोबत ठेवले पाहिजे. व्यायाम करण्यापूर्वी चांगल्या रीतीने वॉर्म-अप करावेत. आधी सिंगल-जॉइंट आणि नंतर मल्टी-जॉइंट हालचाल कराव्यात. पाठ व पोट शरीराच्या इंजिनासारखे आहे. मजबूत कोरने बॉडी पॉश्चर चांगला राहील आणि इजा होणार नाही. त्यामुळे कोरसाठी व्यायाम करावा. हा व्यायाम सत्राच्या सुरुवातीला करावा. सपाट ट्रेडमिलवर व्यायाम करण्याऐवजी थोड्या उंचीवर व्यायाम केल्यस खऱ्या धावण्यासारखा फायदा मिळेल. नवीन वर्षात व्यायामाचा संकल्प केल्यास तो जानेवारीमध्येच मोडतो. थंडी किंवा धुक्यामुळे असे होऊ शकते. त्यामुळे संकल्प कधीही सुरू करता येईल. आधीपासूनच व्यायामाची योजना आखली पाहिजे. फक्त धावण्याच्या यंत्रावर ३०-४० मिनिटे घालवण्याऐवजी वैविध्य राखल्याने चांगला फरक दिसून येईल.अशा पद्धतीने व्यायामाचे नियोजन आणि निवड केल्यास लवकरच शरीरावर त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात.