आरोग्यानामा ऑनलाइन टीम : दुधी भोपळ्याची भाजी, खिर, हलवा शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. दुधी भोपळ्यात अनेक औषधी घटक असल्याने अनेक आजार दूर पळतात. या भोपळ्याच्या नियमित सेवनाचा सल्ला तज्ज्ञ देतात. दुधी भोपळ्याचे महत्व पुन्हा एकदा बाबा रामदेव यांनी चर्चेत आणले. त्यामुळे भोपळ्याची भाजी खाण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. चांगल्या भोपळ्याचा रस प्यावा, असे बाबा रामदेव सांगातात.आपल्याकडे पालेभाज्यांचे महत्व लोकांना माहित असल्याने भाज्या मोठ्याप्रमाणात सेवन केल्या जातात. मात्र, त्या तुलनेत दुधी भोपळ्यासारखी भाजी खूपच कमी प्रमाणात खाल्ली जाते.
लोकांना भाज्यांचे महत्व कळल्यानेच पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. विविध आजारांवर गुणकारी असलेल्या दुधी भोपळ्याचे महत्वही लोकांना कळले तर आरोग्य सर्वांनाच प्राप्त होऊ शकते. घरी पाहुणे आले तर भोपळ्याची भाजी त्यांना खाऊ घाला. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहिल आणि पाहुण्यांच्याही आरोग्याचे पोषण होईल, असे बाबा रामदेव सांगतात. दुधी भोपळ्याला इंग्रजीत बॉटल गार्ड या नावाने ओळखले जाते. मानवजातीने सर्वप्रथम घेतलेले भाजीचे पीक म्हणजे दुधी भोपळा, असे म्हटले जाते.दुधी भोपळ्यात प्रोटीन, फायबर, मिनरल, कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर असते. भोपळ्यात अनेक औषधी गुण आहेत. कमी मसाला घालून भोपळा उकडून त्याची भाजी खाल्ल्यास डायूरेटिक, डिप्रेशन या आजारांत फरक पडतो. पित्त दूर करणारी ही औषधी वनस्पती आहे.
भोपळ्याचा रस काढून लिंबू रसासोबत रोज सकाळी एक ग्लास घेतल्यास हा रस नैसर्गिक अल्कलाझरचे काम करतो. लघवीत होणारी जळजळ यामुळे ताबडतोब दूर होते. डायरियाच्या आजारात भोपळ्याच्या रसात थोडे मीठ आणि साखर मिसळून दिल्यास लगेच आराम मिळतो. भोपळ्याच्या रसात सीसम तेल मिसळून तळव्यांवर हळूवारपणे चोळल्यास चांगली झोप लागते. मिर्गी आणि अन्य आजारांत हा रस गुणकारी आहे. अॅसिडिटी, पोटाचे विकार, अल्सरचा त्रास असल्यास भोपळ्याच्या रसाचे सेवन करावे. या रसाने हे रोग दूर पळून जातील. नियमित भोपळ्याची भाजी खाल्ल्याने जुनी बद्धकोष्ठताही दूर होते. सहज उपलब्ध होणारी ही भाजी अनेक आजारांना पळवून लावते. मात्र, भोपळ्याचा रस पिण्यापूर्वी त्याची चव घेतली पाहिजे. चव कडू असल्यास अशा भोपळ्याचे सेवन करू नका, असे आवाहन काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले होते. भोपळ्याच्या रसासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक संशोधन केले होते. या संशोधनाच्या आधारावर हे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे भोपळा कडू लागल्यास त्याचे सेवन करू नका.