‘हे’ पदार्थ आहेत मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे शत्रू
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जंकफूडचे सेवन जास्त केल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हा त्रास सर्वच वयोगटातील लोकांना होऊ शकतो. जंकफूडचा विपरीत परिणाम मेंदूशी संबंधित कार्यावर होतो. त्याचप्रमाणे इतर आरोग्य समस्या वाढू शकतात. यामुळे आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिडची कमतरता होते. तसेच रिफाइंड कार्बचे प्रमाण वाढल्याने रक्तामधील साखरेत अनियमितता होण्याची शक्यता वाढते. अशावेळी पीडित व्यक्तीला थकवा आणि आळस जाणवतो. नैराश्य वाढवणाऱ्या घटकांमध्ये जंकफूडचा समावेश होतो.
कृत्रिम गोडवा निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे सॅक्रोलॉजमुळे स्मरणशक्तीचे नुकसान होते. फास्ट फूड किंवा जंकफूडचा मेंदूवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधकांनी उंदरांना डोस दिला असता निरीक्षणात असे दिसून आले की याचा न्यूरोकेमिस्ट्रीवर वाईट परिणाम होतो. अशाने अल्झायमर होण्याची शक्यता वाढते. जंकफूड, फ्राइड किंवा प्रोसेस्ड आहारामुळे ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. फॅट वाढल्याने मेंदूला मिळणारे संकेत प्रभावित होतात. भूक ही मेंदूकडून नियंत्रित केली जात असते. मेंदूला मिळणारे संकेत प्रभाव झाल्यामुळे भूक लागत नाही. तसेच अनेकवेळा भूक लागल्याचा भास होतो, पण जेवण जात नाही, अशी समस्या जाणवते. त्याचप्रमाणे ओव्हरइटिंगची समस्या होते. ओव्हरइटिंगमुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
कृत्रिम रंग आणि प्रक्रिया केलेले जंकफूडचे अधिक सेवन केल्याने व्यक्तीच्या व्यवहारावर विपरीत परिणाम होतो. वैज्ञानिक भाषेत याला हायपर अॅक्टिव्हिटी म्हणतात. यात व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होतो. लहानसहान गोष्टींचा लगेच राग येतो. पीडित व्यक्ती विनाकारण चिंतेत अडकण्याची शक्यता जास्त वाढते. कोणतीही सवय अचानक सोडणे कठीण असते. यासाठी जंकफूडचे सेवन करण्याची सवय हळूहळू सोडली पाहिजे.