एक्झेमा नियंत्रणात येऊ शकतो, अशी घ्या काळजी
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – एक्झेमा (अॅटॉपिक डर्मेटिटिस) या त्वचारोगात त्वचा लालसर दिसते. खाज सुटते, अंगावर पुरळ उठतं. प्रौढांपेक्षाही लहान मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळते. एक वर्षाची होईपर्यंत देशातल्या २० टक्के मुलांमध्ये अॅटॉपिक डर्मेटिटिसची लक्षणं दिसून येतात. तर ६० टक्के मुलांना एक्झिमा होतो. थंडीत ही समस्या जास्त प्रमाणात भेडसावते. अॅटॉपिक डर्मिटिटिस जनुकीय तसंच पर्यावरणीय कारणांमुळे ही समस्या उद्भवते.
जास्त वेळ आंघोळ करणं, मॉईश्चरायझिंग क्रीम न वापरणं, रसायनयुक्त साबण वापरणं, वातावरणात कमी झालेली आर्द्रता, ताण, सिंथेटिक किंवा लोकरी कपड्यांचा वापर, काही प्रकारचे सुगंध, प्रदूषित कण अशा अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवते. यासोबतच दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, दाणे, सोया गहू, मासे आदींच्या सेवनामुळेही अंगावर पुरळ उठू शकतं. अॅटॉपिक डर्मेटिटिसवर अनेक उपचार उपलब्ध आहेत. हा अगदी सहज नियंत्रणात येणारा विकार असल्याने पालकांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही.
यात सुरुवातीला अगदी सरळ साधे उपाय सुचवले जातात. त्यात कोमट पाण्याने आंघोळ करणं, नैसर्गिक घटकयुक्त साबणांचा वापर, मॉईश्चराझर लावणं, कमी वेळ आंघोळ करणं असे उपाय सुचवले जातात. अंगावर उठलेल्या पुरळासाठी टॉपिकल स्टेरॉइड्सचा पर्यायही आहे. इसब होऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपायही करता येतील. बाजारात लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणारी बरीच उत्पादनं उपलब्ध आहेत. त्यापैकी सौम्य स्वरूपाच्या उत्पादनांचा वापर करावा. मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये घातक घटक नाहीत, याची खात्री करून घ्यावी. सुगंधी द्रव्यं असलेली उत्पादनं शक्यतो वापरू नयेत.