आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. याकाळात त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर झालेली असते. अशावेळी त्यांना कोणत्याही आजाराची लागण होण्याची जास्त शक्यता असते. वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला होणे हे सामान्य आहे. परंतु, गरोदर महिलांना हा त्रास जास्त होतो. शिवाय, या काळात महिला पोटातील बाळाच्या काळजीपोटी औषधही घेत नाहीत. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊ शकता. मात्र, यापेक्षा गरोदरपणात अशा आजारांपासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय करणे योग्य ठरते. हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
१. गरम पाणी, सूप, चहा
सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास तुळस, मध आणि आल्याचा चहा घेतल्यास खुप फायदा होतो. यामुळे थकवाही दूर होतो.
२. वाफघेणे
सर्दी खोकल्यावर वाफ घेणे हा एक चांगला उपाय आहे. एका भांड्यात गरम पाणी घेऊन कपड्याने झाकून काही अंतरावर तोंड ठेवावे. यामुळे बंद नाक उघडले जाईल. डोकेदुखी थांबेल. दिवसात दोन-तीन वेळा अशाप्रकारे वाफ घ्या.
३. यूकेलिप्टस तेल
सर्दी, खोकल्यामुळे नाक बंद झाल्याने श्वास कोंडल्यासारखे वाटते. यासाठी झोपण्यापूर्वी उशीवर यूकेलिप्टस तेलाचे काही थेंब शिंपडावे. याचा वास घेतल्याने बंद नाक मोकळे होईल. झोपसुद्धा चांगली येते.
४. शरीर गरम ठेवा
जर वातावरण थंड असेल तर अंग झाकून घ्या. गरोदरपणात सर्दी, खोकल्यामुळे नेहमीच ताप येतो. तापात अनेकांना थंडी भरून येते. यासाठी शरीरात उष्णता राखण्याचा प्रयत्न करा.
५. संतुलित आहार
संक्रमणापासून दूर राहण्यासाठी योग्य आहार घेणे खुप जरूरी आहे. कफ वाढविणारे पदार्थ खाऊ नका. याकाळात जास्त थंड आणि जास्त उष्ण पदार्थ खाऊ नका. सूप आणि हिरवा भाजीपाला जास्त खा.