आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लहान मुलांच्या कानाच्या छोट्या-छोट्या तक्रारी सुरूच असतात. वेळीच या छोट्या तक्रारींवर उपचार केले नाहीत तर नंतर यातून मोठा त्रास होऊ शकतो. कानाच्या छोट्या समस्यांसाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. यामुळे पटकन आरामही पडतो. कान फुटणे अथवा कानातून पू येणे अशा समस्या लहान मुलांना सतावत असता. या समस्या होण्याची विविध कारणे असतात.
लहान मुलांना सर्दी झाल्यावर कानाच्या पडद्यास छिद्र पडून कानावाटे चिकट, पातळ पू येऊ लागतो. कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालणे, कानाला मार लागणे, दूषित पाण्याने आंघोळ करणे यामुळे कान फुटण्याची समस्या निर्माण होते. तज्ज्ञ सांगतात की, कान फुटण्याचे दोन प्रकार आहेत. सुरक्षित व असुरक्षित हे ते दोन प्रकार आहेत. असुरक्षित प्रकारामध्ये कानाचे हाड कुजते व त्याचा संसर्ग इतर जवळच्या नाजूक भागांना होतो आणि कानामागे पू होतो, आंतरकर्णांना आजार होणे, मेंदूमध्ये व मेंदूभोवतीच्या आवरणामध्ये संसर्ग व पू होतो. यामुळे धोका होऊ शकतो. तर सुरक्षित प्रकारात कानाच्या आजारामध्ये कानामधील हाडांची साखळी व्यवस्थित करून कानाचा पडदा व्यवस्थित बसवून कान कोरडा करणे हे शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट असते.
असुरक्षित प्रकारच्या कानाच्या आजारामध्ये कानाच्या पडद्यामागे कोलेस्टेटोमा नावाचा आजार असतो. या आजारात कानाचे नाजूक भाग व कानाचे हाड कुजते व झडते. या आजाराच्या शस्त्रक्रियेत असा आजार पूर्णपणे काढून कानातील सर्व खराब झालेले हाड काढून कान सुरक्षित केला जातो. कानाच्या आजाराची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही औषधी व प्रतिजैविके दिली जातात. यामुळे कानातील सूज कमी होते. तसेच कानाची क्ष-किरण तपासणी केली जाते. शिवाय रक्ताची व इतर तपासणी करून कानाची शस्त्रक्रिया केली जाते.