आरोग्यानामा ऑनलाइन टीम – एचआयव्हीची लागण होण्याच्या वेगाच्या बाबतीत पाकिस्तान आशियात दुसऱ्या स्थानी आहे. शिक्षणाचा अभाव असल्याने लोकांमध्ये एचआयव्ही-एड्सबाबत अज्ञान आहे. आरोग्य सुविधांचा अभाव आणि बोगस डॉक्टरांमुळे येथे एड्सने विक्राळ रूप धारण केले आहे. पाकमध्ये आज सुमारे ६ लाख बोगस डॉक्टर्स कार्यरत आहेत. त्यापैकी पावणेतीन लाख डॉक्टर एकट्या सिंध प्रांतात आहेत. हे डॉक्टर पैसे कमावण्यासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला इंजेक्शन देतातच. एकच इंजेक्शन, सुई अनेक रुग्णांसाठी वापरत असल्याने एचआयव्हीसह अन्य रोगांचा फैलाव वेगाने होत आहे.
दक्षिण पाकिस्तानच्या लरकाना जिल्ह्यात अचानक मोठ्या प्रमाणात एचआयव्हीची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. एचआयव्हीग्रस्तांमध्ये बालकांची संख्या सर्वाधिक आहे. सिंध प्रांतातल्या लरकानामधील वासायो गावात गेल्या काही दिवसांपासून तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक तैनात करण्यात आले असून, सरकारी रुग्णालयात आसपासच्या गावांमधील लोकांनी मोठी गर्दी केली आहे. लरकाना येथे झालेल्या एचआयव्हीच्या या उद्रेकामागे मुझफ्फर गांघरो नामक एक स्थानिक डॉक्टर आहे. मुझफ्फर बालरोगतज्ज्ञ असून, तो स्वत: एड्सग्रस्त आहे. या डॉक्टरने जाणीवपूर्वक संक्रमित इंजेक्शनच्या सुया वापरल्या. ज्यामुळे त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या मुलांना एचआयव्हीची लागण झाली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
रमाना बीबी नामक महिलेने तिच्या १०वर्षीय अली नामक मुलाला ताप आला म्हणून डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्याला तापाचे औषध दिले. मात्र, आसपासच्या गावातही अनेक मुले आजारी पडत असल्याचे समजल्यानंतर ती घाबरली. तिने तत्काळ अलीच्या चाचण्या केल्या. त्याला एचआयव्हीची लागण झाल्याचे कळाल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरले. या मुलाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या केल्या असता केवळ अलीच एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळला. बहुतांशी मुलांच्या बाबतीत हाच प्रकार घडला आहे.