वाढत्या तापमानामुळे आजारांमध्ये मोठी वाढ
आरोग्यनामा ऑनलाईन टीम- गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळे लहानांपासून ते थोरांपर्यंत अनेकजण विविध आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. प्रत्येक भागातील दवाखाने चांगलेच हाऊसफुल्ल दिसून येत आहे.
वातावरण बदलामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. उन्हामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर घरगुती उपाय न घेता तातडीने जवळील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत.
सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत असल्यामुळे ताप, कावीळ, दमा, त्वचेचे विकार, डोळ्यांचे विकार यासारखे अनेक आजार बळावत आहेत, असे डॉ. प्रमोद जाधव यांनी सांगितले. याबरोबच उन्हात अधिक वेळ फिरल्यामुळे अस्वस्थ वाटणे, थकवा आल्यासारखे वाटणे, चकरा येणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. घराबाहे पडताना कानाला रुमाल बांधा, डोळ्याला थंड चष्मा लावा, सरबत, ताक, मठ्ठा, ओआरएस मिसळलेले पाणी प्या, बाजारात उघड्यावर असलेले पदार्थ खाणे टाळा, बाजारात मिळणारे बाटलीबंद व थंड शीतपेय पिणे टाळा. त्याऐवजी नारळ पाणी प्या.