एका महिन्यात घटवा ५ किलो वजन, करा ‘हे’ उपाय

weight-loss

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन वाढणे ही समस्या अलिकडे खूपच जास्त प्रमाणात दिसून येत आहे. बिघडलेली जीवनशैली यास कारणीभूत आहे. वजन वाढल्याने येणारा लठ्ठपणा आणि त्यातून जडणारे विविध आजार या भितीपोटी अनेकजण वजन कमी ठेवण्यासाठी अथवा नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत काही ना काही प्रयत्न करताना दिसत असतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करणे खूप गरजेचे आहे. आणि या नियोजनानुसार काम केल्यास वजन कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी प्लॅनची माहिती आपण घेणार आहोत, हे प्लॅन फॉलो केल्यास वजन कमी होऊ शकते.

दरवर्षी वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याचा संकल्प करायचा आणि तो अर्धवट सोडून पुन्हा दुसऱ्या वर्षी तोच संकल्प करायचा असे अनेकांच्या बाबतीत सतत सुरूच असते. लग्नसराईच्या काळात चांगले दिसण्यासाठी अनेकजण धडपड करतात. मात्र, क्रॅश डाएटिंग, कधीही घाईघाईत वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टरांकडे एका महिन्यात १० किलो वजन कमी करण्याच्या अपेक्षा घेऊन अनेक लोक जातात. परंतु त्यांची ही अपेक्षा योग्य नाही. त्याचे थेट परिणाम आरोग्यावर होतात. एका महिन्यात जास्तीत जास्त पाच किलो वजनच योग्य पद्धतीने कमी केले जाऊ शकते. यासाठीसुद्धा व्यायामासह उत्तम आहाराची योजना आखणे महत्वाचे आहे. योग्य आहार हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

एक पाउंड म्हणजे ३५०० कॅलरीज होय. एका आठवड्यात एक पाउंड वजन कमी करायचे असेल तर आहारातील ३५०० कॅलरीज कमी कराव्या लागतील. यासाठी आहारावर जास्त लक्ष द्यावे लागेल.पहिल्या आठवड्यात ३५०० कॅलरीज जाळायच्या म्हणजेच त्यासाठी एका दिवसात कमीत कमी ५०० कॅलरीज बर्न कराव्या लागतील. डॉक्टरांनी कॅलरीज कमी करण्याचा सल्ला दिला तर खाणेपिणेच सोडून अयोग्य आहे. २५० कॅलरीज योग्य आहाराद्वारे कमी करा आणि उर्वरित २५० कॅलरीज व्यायामाच्या माध्यमातून कमी कराव्यात. भोजनात जंक फूड बंद करून ब्रेड, बटर यांचे प्रमाणही कमी करता येईल.दररोजचे व्यायामाचे सत्र किमान ४५ मिनिटांचे असावे. रोज व्यायाम करणे शक्य नसेल तर आठवड्यातून किमान चार दिवस तरी व्यायाम केला पाहिजे. ४५ मिनिटांच्या व्यायामात दररोज एकाच प्रकारचा व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. जिम, पोहणे, घरातील दैनंदिन कामकाज करणे, याचाही यामध्ये समावेश करता येऊ शकतो.