आरोग्यानामा ऑनलाइन टीम – कामाचा वाढलेल्या व्याप, मानसिक ताणतणाव यामुळे पूर्ण झोप मिळणे अवघड होऊ बसले आहे. यामुळे निद्रानाशाची समस्या असणारांची संख्या वाढत चालली आहे. काही जण झोप येण्यासाठी गोळ्यांचा आधार घेतात. या सवयीचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे दिसते. झोपेचा त्रास असणारांनी नैसर्गिक उपाय केल्यास गाढ झोप येईल, शिवाय शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.
कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास झोपेची समस्या दूर होते. मॅग्नेशियम नैसर्गिक झोप आणणारे मिनरल मानले जाते. यामुळे तणाव कमी होण्यासही मदत मिळते. स्नायू आणि मेंदूचा तणावही कमी होतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळेसुद्धा झोपेची समस्या उद्भवते.कॅल्शियम आणि मॅग्नेशियम नैसर्गिकरित्या मिळवण्यासाठी दूध, ओट्स आणि अंजीरचे सेवन करावे. रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाश असल्यास झोप येत नाही. कमी प्रकाशात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचा स्राव होतो. या हार्मोनमुळेच झोप येते. त्यामुळे रात्री झोपताना अंधूक प्रकाश असावा अथवा काळोख करावा.
चांगली झोप आणि उशी यांचा जवळचा संबंध आहे. उशी गळा आणि डोक्याला आधार देते तसेच पाठीचा मणकाही ताठ ठेवते. पोटावर झोपल्यास मऊ उशीचा वापर करावा. जर एका कुशीवर झोपत असाल तर मध्यम नरम उशी घ्यावी. आणि सरळ पाठीवर झोपताना थोडी कडक उशी घ्यावी. तसेच झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नये. जास्त जेवल्यास शरीराचे तापमान वाढते आणि झोपही येत नाही. यामुळे योग्यप्रमाणात जेवण घ्यावे. रात्रीच्या जेवणानंतर केळी खावीत. केळीमध्ये असलेल्या ट्रिपटोफोन अँमिनो अँसिडमुळे शरीरात सेरोटोनिन हार्मोनचे उत्सर्जन होते. ते मेंदू आणि शरीर शांत ठेवते. लक्षात ठेवा रात्री झोपताना कधीही चहा-कॉफीचे सेन करू नका.