आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी उठल्यापासून आपण विविध दैनंदिन कामे करतो. यामध्ये सर्वच दैनंदिन कामे खूप महत्वाची असतात. पण अनेकजण केवळ कामाच्या व वेळ कमी आहे या सबबी खाली ही दैनंदिन कामे घाईघाईत उरकताना दिसतात. या सवयीमुळे नंतर खूपच गंभीर परिणाम सहन करावे लागतात. यासाठी महत्वाची दैनंदिन कामे लक्षपूर्वक आणि योग्यवेळ देऊन केली पाहिजेत. ही कामे सावकाशपणे केली तर अधिक फायदेशीर ठरतात, असे तज्ज्ञ सांगतात.भरपूर कामे आहेत, वेळ कमी आहे, धावपळ होते, हे स्वाभाविक आहे, परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घाईघाईत केलेल्या या कामांमुळे आरोग्याचे नुकसान होते. तुम्ही हळूहळू आणि दीर्घ श्वास घेत आहात, तर असे केल्याने नर्वस सिस्टिम संतुलित राहते. यामुळे तणाव कमी होतो, शरीरातील विषारी पदार्थ श्वासावाटे बाहेर पडतात. व्यक्ती मानसिकरीत्या अधिक मजबूत आणि एकाग्रचित्त होते. यामुळे शारीरिक कमजोरी किंवा इतर समस्यांपासून सुटका होते.
नियमितपणे ब्रीदिंग करावी आणि श्वास आत ओढताना त्यावर लक्ष केंद्रित करावे. घाईघाईने पाणी पिताना पोटात पाण्यासोबत हवासुद्धा प्रवेश करते. अशा वेळी मलावरोध होणे किंवा पोट फुगण्याची शक्यता वाढते.तहान भागवण्यासाठी पाणी नेहमी सावकाश प्यावे. तसेच घाईघाईत पाणी प्याल्याने ठसका लागू शकतो. पाणी श्वसननलिकेत जाण्याची भीती असते. कधीही तहान लागल्यावर पाणी पिऊ नये. कारण खूप तहान लागल्यावरच व्यक्ती घाईघाईत पाणी पिण्यासाठी प्रेरित होते. पाणी पिण्यात अंतर ठेवून थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी प्यावे. तसेच वेटलिफ्टिंग कधीही वेगाने करू नये. जे लोक वेट रिपीटेशन १० सेकंद वजन उचलणे आणि चार सेकंद खाली ठेवणे असे आरामात करतात, त्यांच्या स्नायूंना अधिक बळकटी मिळते. जे लोक नियमितपणे केवळ सात सेकंदांतच वेटलिफ्टिंग करतात त्या लोकांच्या तुलनेत १० सेकंदांत असे करणाऱ्या लोकांच्या स्नायूंना दोन महिन्यांच्या आत ५० टक्के बळकटी मिळते. तसेच यामुळे मसल्सची दुखापत होण्याचा धोकाही कमी असतो.
शिवाय आरामात जेवण केल्याने शरीराची फक्त २७९ किलोजूल ऊर्जा खर्च होते. याउलट घाईघाईत जेवण केल्याने ८३७ किलोजूल ऊर्जा नष्ट होते. घाईघाईत जेवण केल्याने पोट भरले असल्याचा संदेश मेंदूला मिळत नाही आणि यामुळे ओव्हरईटिंगचा धोका वाढतो. अन्न चांगल्या रीतीने पचत नाही. त्यामुळे अन्नाचे छोटे-छोटे घास खावे आणि खाद्यपदार्थ चावून खावे. यामुळे पचनक्रियेवर अनावश्यक ताण पडणार नाही.घाईघाईत ब्रश करण्याच्या सवयीमुळे दात कमजोर होतात आणि हिरड्यांना त्रास होतो. हिरड्यातून रक्त येणे किंवा दात दुखणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. तसेच दातांना सडण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या एनॅमल्सनाही नुकसान पोहोचते. ऑस्ट्रेलियन डेंटल असोसिएशन ओरल हेल्थ कमिटीच्या प्रमुख पीट ऑलड्रिड म्हणतात, यापासून बचाव करण्यासाठी ब्रश आरामात आणि हळूहळू करावा.